रिसोड,
customer rights, consumer awareness, ग्राहकांना हक्क आणि जबाबदारी याची जाणीव होण्यासाठी ग्राहक चळवळ व्यापक होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नायब तहसीलदार गजानन जवादे यांनी केले २४ डिसेंबर रोजी येथील तहसील कार्यालया मध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रिसोडच्या वतीने ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, जिल्हा संरक्षण परिषद सदस्य संतोष वाघमारे, जिल्हा कोषाध्यक्ष जयंत वसमतकर, जिल्हा सदस्य मोहन देशमुख, तालुका सचिव विजय देशमुख, जिल्हा सदस्य संजय उखळकर, पुरवठा निरीक्षक गणेश तांगडे हे होते.
यावेळी पुढे बोलताना जवादे म्हणाले ग्राहकांनी आपले हक्क आणि कर्तव्य याची जाणीव ठेवावी तसेच ग्राहकांची कुठेही फसवणूक होणार नाही याचीही संबंधित कार्यालय तथा प्रतिष्ठाने यांनी काळजी घ्यावी.ग्राहकांना आपले हक्क आणि जबाबदारी याची जाणीव होण्याकरिता २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा अमलात आणला त्यामुळे २४ डिसेंबर रोजी ग्राहक दिन साजरा केल्या जातो. त्या अनुषंगाने आज २४ डिसेंबर रोजी येथील तहसील कार्यालयामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रिसोड च्या वतीने ग्राहक दिन साजरा करण्यात आला. खरे तर हा दिवस ग्राहकाचे हक्क आणि कर्तव्य याची जनजागृती करणारा आहे. ग्राहकाने आपल्या हक्काबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता शुद्धता किंमत अंतिम दिनांक प्रमाण इत्यादी सर्व उत्पादन माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येक ग्राहकाला त्याची हवी असलेली वस्तू आणि सेवा निवडण्याचा तसेच पर्याय निवडण्याचा अधिकार आहे ग्राहकांनी फसव्या जाहिरातीला बळी पडू नये विविध प्रतिष्ठान तसेच कार्यालयाने ग्राहकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी असेही आवाहन यावेळी जवादे यांनी केले.
याप्रसंगी संजय उखळकर, प्रा. संजीव गायकवाड, संतोष वाघमारे, जयंत वसमतकर, प्रभाकर पाटील, गजानन बानोरे पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश सरनाईक यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रिसोडचे सर्व सदस्य, पुरवठा विभागाचे कर्मचारी, विविध बँकांचे व कार्यालयाचे प्रतिनिधी, पत्रकार, स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते त्यांना कारणे दाखवा नोटीस बजविण्यात येणार असल्याचे जवादे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश तांगडे, संचलन सादिक शेख तर आभार भाग्यश्री कांबळे यांनी मानले.