धूम्रपानाच्या वादातून आईने केला १६ वर्षांच्या मुलीचा खून

    दिनांक :24-Dec-2025
Total Views |
इस्लामाबाद,
Daughter murdered over a smoking dispute. पाकिस्तानमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली असून आई-मुलीच्या नात्यालाच काळिमा फासणारा हा प्रकार असल्याचे मानले जात आहे. धूम्रपानावरून झालेल्या वादानंतर एका महिलेने रागाच्या भरात आपल्या अवघ्या १६ वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पंजाब प्रांतातील बहावलपूर जिल्ह्यातील बस्ती सोकर भागात घडली असून लाहोरपासून हे ठिकाण सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर आहे.
 

Daughter murdered  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय नबिला अहमद आणि तिची मुलगी आयेशा यांच्यात धूम्रपानाच्या सवयीवरून वारंवार वाद होत असत. आयेशाला तिची आई सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करते हे अजिबात आवडत नव्हते आणि ती अनेकदा तिला रोखण्याचा प्रयत्न करत असे. शनिवारी रात्रीही असाच वाद झाला. आयेशाने पुन्हा एकदा तिच्या आईला धूम्रपान करू नये असे सांगितले, मात्र यावेळी नबिला नियंत्रणाबाहेर गेली. रागाच्या भरात तिने थेट आयेशाचा गळा दाबला आणि काही क्षणांतच तिचा मृत्यू झाला. घटना घडताच नबिला अहमद घटनास्थळावरून फरार झाली. मात्र कुटुंबातीलच एका सदस्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली आणि काही वेळातच आरोपी महिलेला अटक करण्यात आली. पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून लोकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे.
 
दरम्यान, पाकिस्तानमध्ये अल्पवयीन मुलींच्या हिंसक मृत्यूच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने चिंतेत भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच अशाच एका प्रकरणात १७ वर्षांच्या प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सना युसूफ हिची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. अप्पर चित्रालमधील लोकप्रिय टिकटॉक कंटेंट क्रिएटर असलेल्या सनाला तिच्याच एका नातेवाईकाने गोळ्या घालून ठार केल्याचा आरोप आहे. इंस्टाग्रामवर जवळपास पाच लाख फॉलोअर्स असलेल्या सनाने तिच्या व्हिडिओंमधून सांस्कृतिक अभिमान, महिला हक्क आणि शिक्षणाबाबत जनजागृती केली होती. या दोन्ही घटनांनी पाकिस्तानमधील महिलांची आणि मुलींची सुरक्षितता पुन्हा एकदा ऐरणीवर आणली असून घरात आणि समाजात वाढत चाललेली असहिष्णुता किती धोकादायक ठरू शकते, याचे हे भयावह उदाहरण मानले जात आहे.