भेंडे परिवाराने मुलीच्या जन्माचे स्वागत करून दिला समानतेचा संदेश

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घरात उमलली कळी

    दिनांक :24-Dec-2025
Total Views |
कारंजा लाड,
girl child birth celebration, लेक म्हणजे ओझे अशी विकृत मानसिकता अजूनही समाजात कुठे ना कुठे डोके वर काढताना दिसते. मुलीच्या जन्मावर आजही अनेक घरांमध्ये शांतता, निराशा आणि हताशा दिसून येते. मात्र याच अंधारात बांबर्डा येथील भेंडे परिवाराने आशेचा दीप प्रज्वलित केला असून, त्यांनी संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारा संदेश दिला आहे.
 

 girl child birth celebration, 
बांबर्डा येथील गोपाल भेंडे व वैशाली भेंडे यांच्या घरी तब्बल १० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कन्यारत्नाचा जन्म झाला. हा क्षण केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण गावासाठी भावूक करणारा ठरला. अनेक वर्षांची वाट पाहणे, मनात दडलेली भीती, प्रश्न, प्रार्थना आणि अखेर त्या सर्व भावनांवर मात करत लेक घरात आली आणि घराला खर्‍या अर्थाने उजाळा मिळाला. आजही काही ठिकाणी मुलगी झाली म्हणून हळहळ व्यक्त केली जाते. मात्र, भेंडे परिवाराने याउलट जाऊन कन्यारत्नाच्या आगमनाचा आनंद उत्सवात रूपांतरित केला. लेकीच्या जन्माचे स्वागत करताना घरात आनंदाश्रू, समाधान आणि अभिमान स्पष्टपणे दिसून येत होता. मुलीच्या जन्माचे स्वागत फटायांची आतिषबाजी करून आणि गावभर मिठाई वाटून केले. मुलगा-मुलगी समानच नव्हे, तर लेक ही कुटुंबाची खरी शान आहे, अशी भावना गोपाल व वैशाली भेंडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या सकारात्मक विचारसरणीमुळे गावात एक नवी चर्चा सुरू झाली असून, अनेकांच्या मनातील मुलीविषयीचा दृष्टिकोन बदलण्यास ही घटना कारणीभूत ठरली आहे. नातेवाईक, शेजारी आणि ग्रामस्थांनी लेकीच्या आगमनाचे स्वागत करत भेंडे परिवाराचे कौतुक केले. आज जिथे स्त्रीभ्रूणहत्या, लिंगभेद आणि मानसिक गुलामगिरी याविरोधात लढा सुरू आहे, तिथे भेंडे परिवाराची ही कृती समाजासाठी जिवंत उदाहरण ठरली आहे. ही केवळ एका घरातील आनंदाची बातमी नाही, तरमानवतेचा विजय आहे, समानतेचा जयघोष आहे,आणि प्रत्येक लेकीसाठी आशेचा संदेश आहेबांबर्डा येथील भेंडे परिवाराने खर्‍या अर्थाने घरात लेक जन्माला आली नाही, तर घरात लक्ष्मी अवतरल्याचे सिद्ध करून दाखविले. ता.प्र मुलगा मुलगी समानतेचा दिला संदेश.... एकीकडे मुलाला वंशाचा दिवा समजला जात असताना मुलींची मात्र मुलीची मात्र स्त्रीभ्रूणहत्येच्या नावाखाली गर्भातच हत्या केली जात असताना बांबर्डा येथील भेंडे परिवाराने मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून मुलगा मुलगी समानतेचा संदेश दिला आणि मुलगीच घराची खरी लक्ष्मी असल्याचे दाखवून दिले.