तुम्हीच हादीची हत्या केली!

उस्मान हादीच्या भावाचा युनूस सरकारवर आरोप

    दिनांक :24-Dec-2025
Total Views |
ढाका,
Hadi's brother accuses Yunus ढाका येथे विद्यार्थी नेते शरीफ उस्मान यांच्या हत्येनंतर बांगलादेशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. देशभरात असंतोष वाढताना दिसत असून, हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक समुदायांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या साऱ्या घडामोडींमध्ये आता उस्मान यांच्या कुटुंबीयांनी थेट युनूस यांच्या अंतरिम सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शरीफ उस्मान यांचे भाऊ शरीफ उमर हादी यांनी ढाक्यातील शाहबाग येथे झालेल्या आंदोलनात सहभाग घेत सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, फेब्रुवारीमध्ये अपेक्षित असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी देशातील वातावरण अस्थिर करण्याचा हा सुनियोजित डाव आहे. उस्मान कोणासमोरही झुकले नाहीत. त्यांची थेट हत्या करण्यात आली आणि आता त्याच घटनेचा वापर करून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे,”असा आरोप त्यांनी केला.
 
 
muhammad yunus and hadi
 
प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना उमर हादी यांनी सांगितले की, अद्याप खुनींविरोधात ठोस कारवाई झालेली नाही. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जर उस्मान हादी यांना न्याय मिळाला नाही, तर आज सत्तेत असलेल्यांनाही उद्या देश सोडण्याची वेळ येऊ शकते. निवडणुकांवर परिणाम होऊ नये यासाठी तातडीने पावले उचलली जावीत, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, शरीफ उस्मान हादी हे ‘इन्कलाब मोर्चा’ या संघटनेचे प्रवक्ते होते. २०२४ मध्ये शेख हसीना सरकार सत्तेवरून हटवल्यानंतर ही संघटना उदयास आली होती. १२ डिसेंबर रोजी ढाक्यात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी उस्मान यांच्या डोक्यात गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले, मात्र १८ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर बांगलादेशात संतापाची लाट उसळली असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. आंदोलकांनी वृत्तपत्र कार्यालयांसह विविध इमारतींना आग लावली आहे. विद्यार्थी नेत्याच्या मृत्यूनंतर देशातील अस्थिरता वाढत असताना, सरकारवर निवडणुकांपूर्वी मुद्दाम अराजकता निर्माण केल्याचे आरोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत.