हिंगणघाट,
state-level yoga competition महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे द्वारा आयोजित शिक्षक व अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या विभागस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये ४६ ते ५८ या महिला वयोगटात हिंगणघाट येथील योगशिक्षिका पौर्णिमा धात्रक यांनी प्रथम, २५ ते ४५ महिला वयोगटात सुषमा खोडे यांनी द्वितीय तर पुरुष वयोगट २५ ते ४५ मध्ये योग शिक्षक बाळू मुंडे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त करून या तीनही योग स्पर्धकांची नांदेड येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झालेली आहे.
पौर्णिमा धात्रक या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, नंदोरी पंचायत समिती समुद्रपूर येथे कार्यरत आहेत. सुषमा खोडे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नांदगाव पंचायत समिती हिंगणघाट येथे कार्यरत असून बाळू मुंडे हे आदर्श विद्यालय, पिंपळगाव तालुका समुद्रपूर येथे कार्यरत आहेत.हे तीनही योगशिक्षक पतंजली योग परिवार हिंगणघाटचे असून हिंगणघाट व आजूबाजूच्या परिसरात नि:शुल्क योग कक्षा चालवून नागरिकांचे आरोग्य सुदृढ करण्याकरिता प्रयत्न करीत आहेत.
विशेष म्हणजे, सुषमा खोडे या साई मंदिर योगकक्षेतील योग साधिका असून पौर्णिमा धात्रक त्यांच्या शिष्य आहेत. गुरु व शिष्य यांची एकाचवेळी राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत निवड झाल्याने योगायोग साधला आहे. या तीनही शिक्षकांचे राज्यस्तरीय योगासन स्पर्धेकरिता नांदेड येथे निवड झाल्याने गटशिक्षणाधिकारी अशोक गिद्देवार, केंद्रप्रमुख रमेश भिलकर, मुख्याध्यापक निर्मला निखाडे, योगशिक्षक राहुल वंजारे, पंढरी तडस, विजय धात्रक, बाबाराव मस्कर व संपूर्ण योगसाधिका, योगसाधक यांनी अभिनंदन केले.