वाशीम,
illegal liquor raid, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात कठोर पावले उचलण्यात येत असून, त्याच अनुषंगाने २३ डिसेंबर २०२५ रोजी वाशीम जिल्ह्यात विशेष धडक मोहिम राबविण्यात आली. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अमरावती विभागाचे विभागीय उप आयुक्त डॉ. पराग नवलकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.
या विशेष मोहिमेअंतर्गत वाशीम तालुयातील मौजे मोहगव्हाण व सुरकुंडी (शेतशिवार परिसर), तालुका व जिल्हा वाशीम येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी सामूहिक पद्धतीने छापे टाकत अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे समूळ उच्चाटन करण्याची कारवाई केली. या कारवाईदरम्यान एकूण सहा गुन्हे नोंदविण्यात आले असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. कारवाईत सुमारे ६० लिटर गावठी दारू, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारा ४ हजार ८७५ लिटर मोहासडवा (रसायन) तसेच हातभट्टीसाठी लागणारे इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत १ लक्ष ९१ हजार ९०० रुपये इतकी आहे. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.
या धडक कारवाईत विभागीय उपायुक्त डॉ. पराग नवलकर, प्रभारी निरीक्षक वाशीम अनंतकुमार खांदवे, एम. के. उईके, राजरतन मनवर, एम. एस. जाधव, अश्विनी उबाळे, सुरेश दि. चव्हाण, तसेच त्यांच्या अधिपत्याखालील जवान संवर्गीय कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवून ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. दरम्यान, अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती अथवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८०० ०८३ ३३३३, व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.