मुंबई,
Hindustani Bhau राज्यसभेच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी पापाराझींविषयी केलेल्या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, या प्रकरणात सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी पापाराझींना उद्देशून हात जोडून विनंती करत, “जिथे तुमचा आदर केला जात नाही, तिथे जाऊ नका,” असा सल्ला दिला.
विकास पाठक यांनी जया बच्चन यांच्या टिप्पणीचा उल्लेख करताना सांगितले की, पापाराझींमुळेच अनेक कलाकार आणि सेलिब्रिटी ओळखले जातात. “तुम्ही त्यांना दाखवणं थांबवलंत, तर त्यांना त्यांची जागा कळेल. आम्ही जे काही आहोत, ते तुमच्यामुळेच आहोत,” असे ते म्हणाले. ज्या ठिकाणी अपमान सहन करावा लागतो, तिथे जाण्याऐवजी स्वतःचा सन्मान जपण्याचा सल्लाही त्यांनी दिला.पाठक पुढे म्हणाले की, पापाराझींनी आपल्या कामाबाबत आत्मसन्मान ठेवला पाहिजे. “तुमच्यावर जे वरिष्ठ आहेत, त्यांना स्पष्टपणे सांगा की जिथे आदर मिळत नाही, तिथे जाणार नाही,” असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर Hindustani Bhau संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.दरम्यान, जया बच्चन यांनी अलीकडेच पत्रकार बरखा दत्त यांच्या ‘वी द वुमन’ या कार्यक्रमात पापाराझींविषयी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले की, मीडियाशी त्यांचे संबंध चांगले असले तरी पापाराझींशी ते अजिबात चांगले नाहीत. मोबाईल फोनच्या आधारे कोणाचाही फोटो काढणे आणि त्यावर हवी तशी टिप्पणी करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले होते. खासगी आयुष्यात हस्तक्षेप होत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी पापाराझी संस्कृतीवर टीका केली होती.या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी भाऊंची प्रतिक्रिया समोर आल्याने हा वाद अधिकच गडद झाला आहे. एकीकडे कलाकारांच्या गोपनीयतेचा मुद्दा, तर दुसरीकडे पापाराझींच्या कामाचा सन्मान, यावर पुन्हा एकदा सार्वजनिक चर्चेला उधाण आले आहे.