अल्लीपूर,
Prashik Kambale गावातील प्राथमिक शाळा व हायस्कूल शिक्षणाचे धडे घेत प्रशिक शेषराव कांबळे या युवकाने मेहनत, जिद्द व चिकाटीने अभ्यास करून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करीत आयएएस अधिकारी बनला. अल्लीपूर येथील हा पहिलाच युवक आयएएस बनला असून इतर युवकांकरिता प्रेरणादायी ठरला आहे.
प्रशिकने अल्लीपूर येथील यशवंत शाळेमध्ये इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर दहावी व बारावीचे शिक्षण वर्धा येथील न्यू इंग्लिश शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर बी. ई. साठी त्याने पुणे येथील कॉलेजमध्ये प्रवेश घेत पदवी प्राप्त केली. एचसीपीएल मध्ये नोकरी करीत असताना त्याला यूपीएससीचे वेध लागले. यूपीएससीची तयारी करीत असताना पहिल्याच प्रयत्नात त्याने परीक्षा उत्तीर्ण केली.
प्रशिकला दोन बहिणी आहेत. प्रशिकचे वडील शेषराव यांचे ब्रेन हॅमरेजमुळे काही वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर प्रशिकची आई पपिता कांबळे यांच्यावर तिनही मुलांची जबाबदारी आली. मुलांचे पालन पोषण, शिक्षण आणि लग्न ही सर्व जबाबदारी पार पाडत कुटुंबाचा गाडा चालवित होत्या. प्रशिकच्या आईने मोठ्या जिद्दीने मुलांना शिकवले. त्याचे फळ म्हणून प्रशिक आयएएस झाल्याचा आनंद आईने व्यत केला. प्रशिकची निवड वर्ग एक नोकरीत झाल्यामुळे त्याच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गावातील होतकरू गरीब मुला-मुलींसाठी त्याने एक आदर्श घालून दिला.
माजी खासदार सुरेश वाघमारे, जिपचे माजी अध्यक्ष नाना ढगे, माजी सरपंच नितीन चंदनखेडे, श्रीराम साखरकर, प्रा. विनोद मुडे, माणिक कलोडे, अशोक सुपारे, प्रशांत चंदनखेडे, विजय जैस्वाल, सतीश काळे, संजय गावंडे, मित्र परिवार व नातेवाईक यांनी प्रशिकचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.