तुर्कीतील विमान अपघातात लिबियाच्या लष्कर प्रमुखाचा मृत्यू

    दिनांक :24-Dec-2025
Total Views |
इस्तानबुल
The plane crash in Turkey तुर्कीमध्ये घडलेल्या एका गूढ विमान अपघातामुळे मध्य पूर्वेतील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून लिबियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तुर्कीची राजधानी अंकारा येथून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एक खाजगी जेट कोसळले आणि या दुर्घटनेत लिबियाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मोहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात लिबियाच्या सैन्यातील चार वरिष्ठ अधिकारी आणि क्रू मेंबर्सही ठार झाले असून एकही जण वाचलेला नाही.
 
The plane crash istanbul
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे खाजगी विमान अंकारा विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. तुर्की अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात कोणताही घातपात किंवा कटाचा संशय फेटाळून लावला असून अपघाताचे कारण तांत्रिक समस्या असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार तपास अजून सुरू असून अंतिम निष्कर्षानंतरच स्पष्ट चित्र समोर येईल.
 
लिबियाचे पंतप्रधान अब्दुल हमीद दबैबा यांनी सोशल मीडियावर निवेदन जारी करत या दुर्घटनेची अधिकृत पुष्टी केली. तुर्कीहून मायदेशी परतत असताना हे शिष्टमंडळ अपघातग्रस्त झाल्याचे त्यांनी सांगितले. हा अपघात केवळ लिबियन सैन्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रासाठी अपूरणीय नुकसान असल्याचे त्यांनी नमूद केले. देशासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सेवा करणारे नेतृत्व आज लिबियाने गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या दुर्घटनेचा सर्वात मोठा परिणाम लिबियाच्या पुनर्एकीकरणाच्या प्रक्रियेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत्युमुखी पडलेले हे चारही वरिष्ठ लष्करी अधिकारी पश्चिम आणि पूर्व लिबियाला एकत्र आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे प्रमुख चेहरे होते. २०११ मध्ये मुअम्मर गद्दाफीविरोधात झालेल्या नाटो आणि अमेरिका समर्थित उठावानंतर लिबिया दोन भागांत विभागला गेला. गद्दाफीचा पाडाव आणि मृत्यू झाल्यानंतरही देशात स्थिर आणि एकसंध सरकार उभे राहू शकले नाही, त्यामुळे आजही लिबिया राजकीय अस्थिरतेचा सामना करत आहे.