नवी दिल्ली,
Tilak Varma's leap भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेआधीच भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत सूर्यकुमार यादव दीर्घकाळानंतर अव्वल दहामधून बाहेर फेकला गेला असून, विश्वचषकाच्या तोंडावर हा त्याला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. मात्र याच क्रमवारीत युवा फलंदाज तिलक वर्माने दमदार झेप घेत भारतीय चाहत्यांना दिलासा दिला आहे.
आयसीसीच्या नव्या क्रमवारीनुसार भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा अव्वल स्थानावर कायम आहे. ९०८ रेटिंगसह त्याने पहिला क्रमांक टिकवून ठेवला असून वर्षअखेरीपर्यंत तो या स्थानावर राहण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या पाठोपाठ इंग्लंडचा फिल साल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, भारतीय संघासाठी सर्वात आनंदाची बाब म्हणजे तिलक वर्माची कामगिरी. एका स्थानाने आगेकूच करत तो थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून त्याचे रेटिंग ८०५ पर्यंत वाढले आहे. तिलकच्या या प्रगतीमुळे काही आंतरराष्ट्रीय फलंदाजांना क्रमवारीत घसरण स्वीकारावी लागली आहे.
श्रीलंकेचा पथुम निस्सांका एका क्रमांकाने खाली घसरत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, तर इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जोस बटलर पाचव्या क्रमांकावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसनेही लक्षवेधी झेप घेतली असून पाच स्थानांची उडी मारत तो थेट दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, ब्रेव्हिसला पहिल्यांदाच टी-२० क्रमवारीतील अव्वल दहामध्ये स्थान मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर सूर्यकुमार यादवची घसरण अधिक ठळक ठरते. तीन स्थानांनी खाली येत तो आता १३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. बराच काळ टी-२० मधील अव्वल फलंदाजांमध्ये गणला जाणारा सूर्या टॉप १० बाहेर जाणे हे भारतीय संघासाठीही चिंतेचे संकेत मानले जात आहेत. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आणि त्यानंतर होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार यादवला पुन्हा लय मिळवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत तो कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.