दिसपूर,
violence in Assam's Karbi Anglon आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात अचानक हिंसाचाराची झळ आली असून राज्यात इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आल्या आहेत. या संघर्षात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याचे नोंदवले गेले असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. घटनास्थळाच्या माहितीप्रमाणे, व्हिलेज ग्राझिंग रिझर्व्ह (VGR) आणि कमर्शियल ग्राझिंग रिझर्व्ह (PGR) भागातील रहिवासी बाहेरील लोकांना परिसरातून हाकलून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या लोकांना त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणारे म्हणून ठरवले आहे.
या दोन्ही गटांमध्ये वाढलेल्या तणावामुळे संघर्ष प्रचंड गंभीर स्वरूपात वाढला. हा परिसर आदिवासी जमिनीचा हक्क राखण्यासाठी संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत संरक्षित आहे. कार्बी आंगलोंगच्या खेरोनी आणि डोंगकामकम भागात या संघर्षाचा परिणाम पोलिसांपर्यंत पोहचला. निदर्शकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. हिंसाचारात दोन नागरिक ठार झाले तर ४५ जण जखमी झाले आहेत, ज्यात ३८ पोलिस आणि सुरक्षा कर्मचारी देखील आहेत. घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम १६३ लागू करण्यात आले आहे. या कलमानुसार पाच किंवा अधिक लोकांचे एकत्र येणे, रॅली, मशाली मिरवणुका, लाऊडस्पीकर वापरणे बंद करण्यास सांगितले गेले आहे आणि संध्याकाळी ५ ते सकाळी ६ दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
या हिंसाचारामुळे उपोषणावर बसलेल्या नऊ जणांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले. त्यांच्या अटकेची अफवा पसरल्याने जनतेत संताप निर्माण झाला आणि निदर्शने अधिक तीव्र झाली. सोमवारी, २२ डिसेंबर रोजी निदर्शकांनी कार्बी आंगलोंग स्वायत्त परिषदेच्या (KAAC) प्रमुख तुलीराम रोंगहांग यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली. निदर्शनादरम्यान अनेक दुकाने, मोटारसायकली आणि सार्वजनिक मालमत्तेचीही तोडफोड करण्यात आली. पोलिस महानिरीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी सांगितले की, शांतता राखण्यासाठी लोकांशी चर्चा सुरू आहे. नागरिकांनी आपले तक्रारी कायदेशीर मार्गाने मांडाव्यात आणि कायदा हातात घेण्यापासून दूर राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी कार्बी आंगलोंगमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. त्यांनी परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्याचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे.