वर्धा,
Arvi Panchayat आर्वी पंचायत समितीतील मनरेगा निधीच्या अपहार प्रकरणी तत्कालीन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर व गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांना अटक झाली. आता हे प्रकरण तपासाकरिता आर्थिक गुन्हे शाखेकडे वळते करण्यात आले आहे. सन २०१४ ते २०२५ या काळात शासकीय निधीचा अपहार करताना वेळोवेळी संबंधित काळातील बीडीओंची डीएससी वापरली गेल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे येत्या काळात आर्वी पंचायत समितीत सन २०१४ ते २०२५ या काळात बीडीओ म्हणून सेवा देणार्यांच्या अडचणीत भर पडण्याची शयता आहे.
आर्वी पंचायत समितीत मनरेगा निधी अपहार प्रकरणात आतापर्यंत आर्वी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. अटकेत असताना बडतर्फ सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर आणि बीडीओ सुनीता मरसकोल्हे यांचे बयाण नोंदविण्यात आले. जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय चौकशी समितीच्या अध्यक्षांचेही बयाण पोलिसांनी नोंदविले. आर्वी पंचायत समितीत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी व डाटा एन्ट्री ऑपरेटचे बयाण पोलिसांनी थेट न्यायालयासमक्ष नोंदविले आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी २४ डिसेंबरला आर्थिक गुन्हे शाखेकडे वळते करण्यात आले आहे. असे असले तरी प्रणाली कसर व सुनीता मरसकोल्हे यांनी पोलिसात नोंदविलेल्या बयाणात सन २०१४ ते २०२५ या काळातील आर्वीच्या बीडीओ या अपहारात दोषी असल्याचे नमूद केल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. याही बयाणांचा आधार घेत प्राधान्यक्रमाने आर्थिक शाखेने तपासाला गती दिल्यास तत्कालीन १२ गटविकास अधिकार्यांच्या अडचणीत भर पडण्याची शयता आहे.
आर्वीच्या गटविकास Arvi Panchayat अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांना पोलिसांनी अटक करून त्यांची पोलिस कोठडी मिळविल्यावर जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी आर्वी पंसच्या बीडीओ पदाचा अतिरित प्रभार आर्वी पंचायत समितीतील विस्तार अधिकारी (पंचायत) प्रदीप चव्हाण यांना दिला. ४ डिसेंबरला त्यांनी या पदाचा अतिरित प्रभार स्विकारला असला तरी आर्वी पंचायत समितीत असलेल्या श्रेणी ‘अ’ गट विकास अधिकारी कार्यकाळ या फलकावर त्यांचे नाव नमूद करण्यात आलेले नसल्याने आश्चर्य व्यत केले जात आहे.