नाताळ आणि नववर्षानिमित्त तळीरामांसाठी खुशखबर!

मद्यविक्रीस आणि बीअर बारला विशेष सवलत

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Christmas and New Year regulations देशभरात नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. उत्सवाच्या या काळात तळीरामांसाठी खास खुशखबर मिळाली आहे कारण नाताळ (२४ आणि २५ डिसेंबर) तसेच ३१ डिसेंबरच्या निमित्ताने मद्यविक्री आणि बिअर बार उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास शासनाने सवलत दिली आहे. राज्यातील मद्य विक्रीची दुकानं रात्री १ वाजेपर्यंत सुरु राहतील तर पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत बिअर बार आणि इतर आस्थापनांना पहाटे ५ वाजेपर्यंत काम करण्याची परवानगी मिळाली आहे. अनुज्ञप्तीच्या प्रकारानुसार वेळा पुढीलप्रमाणे आहेत. एफएल-२ (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान) रात्री १०.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत विक्रीची परवानगी असेल. उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची मद्यविक्री असलेली एफएल-२ रात्री ११.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत विक्रीस परवानगी मिळेल.
 
 
31st celebration
 
एफएलडब्ल्यू-२ आणि एफएलबीआर-२ रात्री १०.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत विक्री करू शकतील. एफएल-३ (परवाना कक्ष) आणि एफएल-४ (क्लब अनुज्ञप्ती) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रात्री १.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत विक्री करू शकतील आणि हद्दीतून बाहेर रात्री ११.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी मिळेल. नमुना ई (बीअर बार) आणि ई-२ मध्यरात्री १२ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत विक्री करू शकतील. सीएल-३ महानगरपालिका तसेच ‘अ’ व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत आणि इतर ठिकाणी रात्री १० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत विक्री करू शकतील.
 
सवलत मिळाल्यानंतरही सार्वजनिक शांतता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी आवश्यकतेनुसार वेळेत बदल करू शकतील. नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने पोलिसांनी जागोजागी कडक बंदोबस्त ठेवला आहे. ड्रंक अँड ड्राइव्हसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस सजग राहतील तसेच अवैध मद्य विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक तैनात राहणार आहे.