...तर फसगत अटळ आहे

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
 
तंत्रवेध
डॉ. दीपक शिकारपूर
financial crimes डिजिटल युगात आपले दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणात मोबाईल, संगणक आणि इंटरनेटवर अवलंबून आहे. बँकिंग व्यवहारांपासून सोशल मीडियावरील संवादापर्यंत प्रत्येक कृती आता ऑनलाईन होते. अशा वातावरणात सायबर गुन्हेगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे गुन्हे माहिती चोरीपासून आर्थिक फसवणूक, सोशल मीडिया अकाऊंट हॅकिंग, बनावट ओळख वापरून त्रास देणे, मालवेअर हल्ले, फिशिंग अशा अनेक स्वरूपांमध्ये घडतात. तंत्रज्ञान वापरून सायबर गुन्हेगार आर्थिक गुन्हे आणि त्यासाठीचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. इंटरनेट तंत्रज्ञानाला भौगोलिक सीमा नसल्यामुळे ते उघडकीस आणणे पोलिसांसाठी अवघड ठरते. त्यामुळेच सायबर गुन्हे टाळण्याचे प्रयत्न अधिक महत्त्वाचे ठरतात. तसे म्हटले तर, मोबाईल आणि इंटरनेट ही अत्यंत प्रभावी साधने आहेत. त्यांचे छुपे सामर्थ्य ओळखून डोळसपणे उपयोग केला तर बरीच कामे सहजपणे होतात, खर्च तसेच वेळ वाचतो आणि वापरकर्त्याच्या ज्ञानातही भर पडते. या तंत्राचा वापर करून डिजिटल व्यवसाय करता येतो. पण त्यासाठी सायबर सुरक्षेचा कळीचा मुद्दा लक्षात घेणे जरूरीचे आहे. पूर्वी सुरक्षा केवळ भौतिक गोष्टींची गणली जायची. मात्र आता सायबर सुरक्षेबरोबरच सर्व संगणकीय भांडवलाची तसेच माहितीची सुरक्षादेखील अत्यावश्यक बाब झाली आहे.
 
 सायबर गुन्हेगार
 
या चर्चेच्या पृष्ठभूमीवर सर्वप्रथम सायबर गुन्ह्यांची वैशिष्ट्ये समजून घेऊ या. जसे की, यात सहभागी असणारा गुन्हेगार कुठूनही कारवाई करू शकतो. पुरावे डिजिटल असल्याने लपवता येतात. अनेकदा पीडित व्यक्तीला गुन्हा घडल्याचे उशिरा कळते आणि मुख्य म्हणजे हे गुन्हेगार आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असतात. आपण पाहतो की, नववर्षाच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्रामवर शुभेच्छा संदेश तसेच ग्रीटिंग कार्ड, व्हिडीओ, लिंक शेअर करतात. अशा भावनिक वातावरणाचा फायदा घेणे हे अनेक सायबर गुन्हेगारांचे प्रमुख धोरण असते. विशेषतः फिशिंग लिंक असणारे संदेश अत्यंत धोकादायक ठरतात. अशा संदेशांमध्ये लिंक असते. त्यावर क्लिक करणाऱ्याचा डेटा, ओटीपी (वनटाईम पासवर्ड), बँक तपशील आदी लगेचच चोरी होतो.
बनावट शुभेच्छा वेब पेज, ई-मेल किंवा व्हॉट्स अ‍ॅपवर एक अशी लिंक मिळते; त्यावर क्लिक करताच मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल होते. सोशल मीडिया अकाऊंट हॅकिंग प्रकारात शुभेच्छा देण्याच्या नावाखाली काही अ‍ॅप डाऊनलोड करण्याची विनंती केली जाते. ते अ‍ॅप परवानगी मागून फोनमधील प्रणालीत प्रवेश मिळवतात. क्यूआर कोड स्कॅममध्ये क्यूआर कोडद्वारे बँक खात्यातून पैसे वळते करून घेतले जातात. असे गुन्हेगार डिजिटल प्रतिष्ठा वाढविण्याचे नवे तंत्र शोधत म्हणतात की, ‘हा मेसेज 50 लोकांना पाठवा, तुमचे भाग्य फुलेल’ अशा चेनमधून तुमचा डेटा ट्रॅक होऊन पुढील फसवणुकीसाठी वापरला जातो.
या आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे परिणाम केवळ आर्थिक नसतात तर मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर तसेच अत्यंत गंभीर असू शकतात. जसे की, फिशिंग लिंक किंवा क्यूआर कोडवर क्लिक केल्यास खात्यातून पैसे त्वरित दुसऱ्या खात्यात वळते होतात. अनेकदा पीडिताला कळण्यापूर्वीच खाते रिकामे झालेले असते. फोनमधील फोटो, संपर्क क्रमांक, ई-मेल, डॉक्युमेंट्स यांची चोरी झाल्यानंतर हा डेटा ब्लॅकमेलिंग किंवा ओळख चोरीसाठी वापरतात. अकाऊंट हॅक झाल्यास गुन्हेगार त्यातून खोटे संदेश पाठवून फसवणूक करतात. त्यावरून अश्लील छायाचित्र, व्हिडीओ टाकले गेल्यास व्यक्तीची प्रतिमा खराब होते. फसवणूक झाल्यानंतर भीती, अपराधीपणा, मानसिक दबाव तसेच कुटुंबातील तणाव वाढतो. अशा घातपातामुळे संस्थात्मक सुरक्षा भंगाचा मोठा धोकाही लक्षात घ्यायला हवा. जसे की, एखाद्या कर्मचाऱ्याने अशा संदेशांवर क्लिक केल्यास ऑफिस नेटवर्कमध्ये मालवेअर प्रवेश करू शकतो. तसे झाल्यास कंपनीवर रॅन्समवेअरचा हल्ला होऊ शकतो.
दरवर्षी सायबर गुन्ह्यांची पद्धत बदलत असते. नवे वर्ष जवळ आल्यावर त्यांच्या तंत्रात काही नव्या गोष्टी दिसतात. उदाहरणार्थ, एआयच्या मदतीने अगदी नैसर्गिक दिसणारे शुभेच्छा संदेश, आवाज, व्हिडीओ तयार केले जातात आणि एखाद्याला ते खरे वाटतात. नववर्षाच्या शुभेच्छा म्हणून ओळखीच्या व्यक्तीचा आवाज किंवा चेहरा वापरून बनावट व्हिडीओ पाठविला जातो आणि दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. नंतर फसवणूक करणारे बॉट वापरून त्वरित उत्तर देतात आणि विश्वास निर्माण करून संवेदनशील माहिती मागतात. सोशल इंजिनीअरिंग तंत्र वापरून मानसशास्त्रीय पद्धतीने व्यक्तीला आकर्षित करण्याच्या उद्देशानेही भावनिक संदेश पाठविले जात आहेत. तेव्हा फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही सोप्या, पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची दखल घ्यावी.
कोणत्याही शुभेच्छा संदेशातील लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तीन सेकंद थांबा आणि हा संदेश कोणाकडून आला आहे, हा प्रश्न स्वत:लाच विचारा. त्यामध्ये अपेक्षित नसणारी लिंक नसल्याची खात्री करा. संदेशातील भाषा किंवा ऑफर संशयास्पद दिसत असेल तर सावध व्हा. अनोळखी क्रमांक किंवा अचानक संपर्क साधणाèया व्यक्तीकडून आलेल्या शुभेच्छा संदेशांवर विश्वास ठेऊ नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या बँक खात्याचा तपशील कधीही शेअर करू नका. कुठल्याही शुभेच्छा संदेशासाठी बँक तपशील विचारला तर ती 100 टक्के फसवणूकच असते. त्याचप्रमाणे क्यूआर कोड स्कॅन करतानाही कायम सावध राहा. फक्त विश्वसनीय स्रोतांमधील क्यूआर कोड स्कॅन करा. कधीही गिफ्ट किंवा लकी ड्रॉसाठी क्यूआर स्कॅन करू नका. मोबाईलमध्ये अँटीव्हायरस आणि सिक्युरिटी कायम अपडेट ठेवा. सिस्टिम अपडेट, अँटीव्हायरस तसेच सुरक्षित ब्राऊझर वापरा. नेहमी द्विस्तरीय प्रमाणीकरण वापरा. सोशल मीडिया, ई-मेल, बँकिंगमध्ये ही दक्षता पाळायलाच हवी. यात ओटीपीशिवाय लॉगिन होऊच नये, अशी व्यवस्था असते. खेरीज सार्वजनिक वायफाय वापरतानाही सतर्क राहावे. पब्लिक वायफायवर कधीही महत्त्वाची बँकिंग अ‍ॅक्टिव्हिटी करू नका.
इतकी काळजी घेऊनही दुर्दैवाने सायबर गुन्हा झाल्यास काय करायचे हेदेखील जाणून घेऊ या. सर्वप्रथम अशा फसवणुकीनंतर त्वरित 1930 या राष्ट्रव्यापी हेल्पलाईनवर संपर्क साधा. सायबर फसवणूक झाल्यास लगेच फोन करून तक्रार नोंदवा. लगोलग बँक किंवा सेवा पुरवठादाराला तत्काळ कळवा. त्यानंतर सोशल मीडिया अकाऊंट रिकव्हर करत पासवर्ड बदला आणि अकाऊंट रिपोर्ट करा. नववर्ष हा आनंदाचा, आशावाद निर्माण करणारा सण आहे. मात्र, या उत्साहात सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज डिजिटल साधने वापरणे अपरिहार्य असले, तरी सजगता, सावधपणा आणि माहितीची अचूकता यांचे पालन करणेही अत्यावश्यक आहे. अगदी आदिमकाळापासून पाहिले तरी दिसते की, कोणताही समाज किंवा संस्कृती गुन्हेगारीपासून कधीच पूर्णतः मुक्त नव्हती आणि यापुढेही नसेल. त्यामुळे (कोणत्याही प्रकारच्या) गुन्ह्यांचे स्वरूप आणि मुळात ते का केले जातात, याचा विचार (प्रतिबंधक उपायांबरोबर) करावाच लागेल. कुठल्याही घटनेला दोन बाजू असतात. साधे सुरीचे उदाहरण घेतले तरी फळ कापण्यासाठी किंवा एखाद्याला इजा करण्यासाठी वापर होऊ शकतो. संगणक, मोबाईल आणि इतर आधुनिक उपकरणांचेही तसेच आहे. जगणे, व्यवहार, उद्योग, व्यापार वेगवान आणि सुलभ करण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित तसेच लोकप्रिय झाले. पण यामुळे निर्माण होणारा ई-कचरा, सायबर गुन्हे, डिजिटल व्यसनाधीनता यासंबंधीच्या जाणिवा प्रगल्भ व्हायला हव्यात. तरच आपण त्याच्याशी संबंधित धोक्यांपासून दूर राहू शकू.
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)
---