ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक पंचायत कटिबद्ध

दिग्रस तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक हक्कदिन साजरा

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
world-consumer-rights-day : ग्राहक हा बाजारव्यवस्थेचा केंद्रबिंदू असून त्याच्या हक्कांचे संरक्षण होणे ही काळाची गरज आहे. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देत त्यांना सक्षम व जागरूक करण्यासाठी दरवर्षी 24 डिसेंबर रोजी जागतिक ग्राहक हक्कदिन साजरा केला जातो. याच अनुषंगाने तहसील कार्यालय, दिग्रस यांच्या वतीने आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा दिग्रस यांच्या सहकार्याने जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला.
 
 
y25Dec-Panchayat
 
कार्यक्रमात बोलताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे दिग्रस तालुका अध्यक्ष रामदास पद्मावार म्हणाले, खोट्या जाहिराती, फसवणूक आणि अन्यायकारक व्यवहारांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहकांनी सजग राहणे आवश्यक आहे. ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक पंचायत कटिबद्ध आहे. प्रत्येक ग्राहकाने आपल्या हक्कांची माहिती करून घ्यावी.
 
 
सरस्वती पूजनाने सुरवात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार सुधाकर राठोड होते. यावेळी ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मतीन खान, ठाणेदार वैद्यनाथ मुंडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुरेंद्र मिश्रा, पुरवठा निरीक्षण अधिकारी सत्यम बांते, अ‍ॅड. केजी देशपांडे, अभय इंगळे व डॉ. मुरलीधर राठी मंचावर उपस्थित होते.
 
 
प्रा. मतीन खान यांनी ग्राहकांनी खरेदी करताना घ्यावयाची काळजी, बिल घेण्याचे महत्त्व व तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. ठाणेदार वैद्यनाथ मुंडे यांनी आभासी व्यवहार करताना फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. अ‍ॅड. केजी देशपांडे यांनी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर उपाययोजनांची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी ग्राहकांनी नेहमी जागरूक राहून व्यवहार केल्यास अन्याय व फसवणूक टाळता येईल, असे सांगितले. प्रास्ताविक ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र प्रमुख अभय इंगळे यांनी केले. संचालन पुरवठा निरीक्षक प्रेम राठोड यांनी केले. तर आभार भाग्यश्री थेर यांनी मानले.
 
 
कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे शरद जोशी, हनुमान रामावत, नीरज दुद्दलवार, अमित पडगिलवार, राम मार्शटवार, अब्दुल रफिक, विनायक दुधे यांच्यासह विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी, रास्त भाव दुकानदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने विशेष पुढाकार घेतला.