जयपूर,
Fans chanted slogans in the stands जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर विजय हजारे ट्रॉफीतील सामना केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो रोहित शर्माच्या लोकप्रियतेचे आणि चाहत्यांच्या भावना व्यक्त होण्याचे व्यासपीठ ठरला. तब्बल सात वर्षांनंतर या स्पर्धेत पुनरागमन करत रोहित शर्माने सिक्कीमविरुद्ध अवघ्या ६२ चेंडूंमध्ये शतक झळकावून मैदान गाजवले. मुंबईकडून सलामीला आलेल्या रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आणि स्टेडियमच्या चारही बाजूंना फटके मारत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या सामन्यात एक वेगळाच क्षण तेव्हा पाहायला मिळाला, जेव्हा प्रेक्षकांनी थेट टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना उद्देशून घोषणाबाजी सुरू केली. गंभीर, रोहितची हुशारी पाहत आहेस का? अशा घोषणा स्टँडमधून ऐकू येऊ लागल्या. काही वेळातच ‘टॉप रोहित’चे नारे लागले आणि गंभीरची खिल्ली उडवली गेली. रोहित आणि गंभीर यांच्यातील कथित मतभेद, तसेच रोहितकडून कसोटी क्रिकेटची निवृत्ती आणि एकदिवसीय कर्णधारपद जाणे, या पार्श्वभूमीवर चाहत्यांचा हा सूर अधिक ठळक वाटत होता.
साधारण तीन हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये रोहितला पाहण्यासाठी दहा हजारांहून अधिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती. ख्रिसमसच्या आदल्या दिवशी रोहितने केलेली ही फलंदाजी जणू क्रिकेटप्रेमींसाठी सणासारखी ठरली. प्रत्येक चौकार-षटकारानंतर स्टेडियममध्ये ‘रोहित-रोहित’चा गजर होत होता. रोहित क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला तेव्हाही त्याची उपस्थितीच प्रेक्षकांवर प्रभाव टाकत होती. जयपूरमध्ये रोहित आल्यापासूनच शहरात क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मंगळवारी मुंबई संघाच्या सराव सत्रावेळी रोहितला पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी शेकडो चाहते जमले होते. काही वेळा सुरक्षेच्या बंधनांनाही छेद जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सामन्याच्या दिवशी सकाळपासूनच स्टेडियमबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. चाहत्यांचा उत्साह पाहता राजस्थान क्रिकेट असोसिएशनने टॉसच्या एक तास आधीच प्रवेशद्वारे खुले केले आणि सामना पाहण्यासाठी मोफत प्रवेश देण्यात आला.