नवी दिल्ली
India petrol pump network जागतिक अर्थव्यवस्थेच्या शर्यतीत भारत पुढील काही वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याच्या तयारीत असतानाच, आणखी एका महत्त्वाच्या यादीत भारताने थेट अमेरिका आणि चीनच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. जगातील सर्वात मोठ्या पेट्रोल पंप नेटवर्कच्या बाबतीत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून, देशातील पेट्रोल पंपांची संख्या १ लाखांच्या पुढे गेली आहे. या घडामोडीमुळे अमेरिका आणि चीनसारख्या महासत्तांचेही लक्ष भारताकडे वेधले गेले आहे.
अमेरिका आणि चीननंतर सर्वाधिक इंधन किरकोळ विक्री नेटवर्क असलेला देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. सध्या अमेरिका आणि चीनमध्ये प्रत्येकी सुमारे १.१० ते १.२० लाख पेट्रोल पंप आहेत, तर भारतात ही संख्या १,००,२६६ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे भारत आणि या दोन देशांमधील अंतर आता अवघे दहा हजार पंपांचे राहिले असून, सरकार आणि खासगी कंपन्यांकडून दुर्गम व ग्रामीण भागात वेगाने विस्तार सुरू असल्याने हे अंतर लवकरच कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दशकात भारतातील पेट्रोल पंप नेटवर्क जवळपास दुप्पट झाले आहे. ग्रामीण भागात वाहनांची वाढती संख्या, दळणवळणाचा विस्तार आणि इंधन सहज उपलब्ध व्हावे यासाठी सरकारी तेल कंपन्यांनी आक्रमक धोरण स्वीकारत मोठ्या प्रमाणात नवीन पंप सुरू केले.
सध्या भारतातील सर्वाधिक पेट्रोल पंप इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडे असून त्यांचे ४१ हजारांहून अधिक पंप कार्यरत आहेत. त्यानंतर भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांचे प्रत्येकी सुमारे २४ हजारांहून अधिक पंप आहेत. खासगी क्षेत्रात नायरा एनर्जी सुमारे ६,९०० तर रिलायन्स-बीपी सुमारे २,१०० पंप चालवते. शेल आणि एमआरपीएलसारख्या कंपन्यांची उपस्थिती तुलनेने मर्यादित आहे. मात्र, एकूण नेटवर्कमध्ये खासगी कंपन्यांचा वाटा अद्याप १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.