'बाबरी मस्जिद को बनाना संभव नहीं, न हम बनने देंगे'... Video

जगद्गुरू रामभद्राचार्य यांची कडक भूमिका

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Jagadguru Rambhadracharya बांगलादेशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्याच्या संकटाला ठामपणे उत्तर देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी सर्व हिंदूंनी एकजुटीने या परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहन केले. बांगलादेशात घडत असलेल्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी यावर सामूहिक आणि गंभीर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले.
 

Jagadguru Rambhadracharya statement, Babri Masjid controversy, 
याच अनुषंगाने पश्चिम बंगालमधील एका वादग्रस्त विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. निलंबित तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायूं कबीर यांनी बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीबाबत केलेल्या दाव्यावर बोलताना रामभद्राचार्य यांनी असे काही होणे शक्य नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. अशा प्रकारची कोणतीही प्रयत्न यशस्वी होणार नाही आणि ती होऊ दिली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
 
 

हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन
जगद्गुरू रामभद्राचार्य हे त्यांच्या वादग्रस्त आणि परखड विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्या वेळी त्यांनी पश्चिम उत्तर प्रदेश ‘मिनी पाकिस्तान’सारखा भासत असल्याचे विधान केले होते. देशात हिंदू संकटाच्या काळातून जात असल्याचा दावा करत हिंदूंना न्याय मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. या विधानावर तीव्र विरोध झाल्यानंतर त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करत पश्चिम उत्तर प्रदेशातील संभल, मेरठ आणि मुजफ्फरनगरसारख्या भागांमध्ये हिंदूंची स्थिती खराब असल्याचा आरोप केला होता.
 
 
यापूर्वी एका रामकथेदरम्यान बोलताना जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी हिंदूंनी आता तटस्थ न राहता सक्रिय होत संघटित होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांनी असा आरोप केला होता की कोणताही अपराध न करता हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. हिंदू धर्म ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावना शिकवतो आणि संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो, मात्र दीर्घकाळ हिंदूंच्या सहनशीलतेला कमजोरी समजले गेले असल्याचे त्यांनी म्हटले होते.तसेच प्रत्येक हिंदू कुटुंबाने आपल्या मुलांना धर्मशिक्षण द्यावे आणि प्रत्येक घरात धर्माची पाठशाळा सुरू व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले. आम्ही कोणालाही छेडत नाही, पण कोणी छेडले तर त्याला सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.