श्रीनगर,
Martand Sun Temple of Kashmir काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मट्टन परिसरात असलेल्या ऐतिहासिक मार्तंड सूर्य मंदिराच्या कुंडात मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हजारो माशांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसत असल्याने स्थानिक रहिवासी, भाविक आणि मंदिर प्रशासनात चिंता व्यक्त केली जात आहे. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या सुमारे दोन आठवड्यांपासून कुंडातील माशांचा मृत्यू सुरू झाला होता. मात्र, अलीकडील दोन ते तीन दिवसांत मृत माशांची संख्या अचानक वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. या घटनेची माहिती मिळताच तज्ज्ञांच्या पथकाने मंदिर परिसराला भेट दिली आणि कुंडातील पाण्यात औषध फवारणी करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, मार्तंड तीर्थ पुरोहित सभेचे माजी अध्यक्ष एम. के. योगी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने माशांच्या मृत्यूबाबत थेट मुख्य सचिव अटल दुल्लू यांची भेट घेतली.

या भेटीत त्यांनी या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत तातडीने चौकशी करून उपाययोजना करण्याची मागणी केली. मोठ्या संख्येने माशांचा अचानक मृत्यू झाल्याने काही नागरिकांनी संभाव्य साथीच्या आजाराची भीतीही व्यक्त केली आहे. मंदिर अधिकाऱ्यांनी कुंडातील पाण्याची सखोल तपासणी करण्याची मागणी केली असून, शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तज्ज्ञ पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी आदिल हुसेन यांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत पाण्यात बॅक्टेरियाचा संसर्ग आढळून आला आहे. या संसर्गामुळे मासे आजारी पडून मृत्युमुखी पडत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच, कुंडाचे पाणी नियमित स्वच्छ ठेवणे आणि माशांना पोषक व दर्जेदार अन्न देणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी दिला.
यापूर्वी भेट दिलेल्या अन्य तज्ज्ञ पथकानेही माशांच्या मृत्यूमागे संसर्ग आणि पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता कारणीभूत असल्याचे नमूद केले होते. त्यांनी काही काळ कुंडाचे पाणी पिण्यासाठी वापरू नये, असा इशाराही दिला होता. मार्तंड सूर्य मंदिराचे अध्यक्ष अशोक सिद्ध यांनी सांगितले की, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी कुंडात मोठ्या प्रमाणावर मासे मरताना पाहिले होते. त्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता पथक पाठवण्यात आले आणि औषध फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. पुढील तपासणीसाठी १६ सदस्यांचे पथक आले असून, भाविकांनी परवानगीशिवाय माशांना खाद्य टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून कुंडातील पाण्याची गुणवत्ता आणि पर्यावरणीय परिस्थितीचा अभ्यास केला जात आहे. प्रशासनाने कारण स्पष्ट झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.