इस्लामच्या चौकटीतून बाहेर पडत पाकिस्तान विकणार जगाला दारू!

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
इस्लामाबाद,
Pakistan will sell alcohol to the world इस्लामिक कायदे आणि कडक निर्बंधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानमध्ये एक अनपेक्षित आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. तब्बल पाच दशकांनंतर पाकिस्तानमधील सर्वात जुनी दारू उत्पादक कंपनी ‘मुरी ब्रुअरी’ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मद्य निर्यात करण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे. या निर्णयानंतर रावळपिंडीतील मुरी ब्रुअरीच्या कारखान्यात उत्पादन वाढवण्यात आले असून, दारूच्या बाटल्या आणि कॅनने भरलेले दृश्य मुस्लिमबहुल देशात लक्ष वेधून घेत आहे. ब्रिटिश काळात, १८६० साली ब्रिटिश सैनिक आणि वसाहतवादी समुदायासाठी मुरी ब्रुअरीची स्थापना करण्यात आली होती.
 
 

pakistanliquor 
 
पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर काही काळ मद्यविक्री सुरू राहिली, मात्र १९७० च्या दशकात झुल्फिकार अली भुट्टो यांच्या सरकारने मुस्लिमांसाठी दारूवर संपूर्ण बंदी लागू केली. त्यानंतर देशांतर्गत वापर मर्यादित झाला आणि निर्यातीवरही निर्बंध आले. तरीही, मुरी ब्रुअरीने नॉन-मुस्लिम समुदायासाठी आणि परवानाधारक ग्राहकांसाठी आपला व्यवसाय सुरूच ठेवला. ही कंपनी सध्या उद्योगपती आणि खासदार इस्फानयार भंडारा यांच्या नेतृत्वाखाली चालते. पारशी समुदायातून आलेले भंडारा हे या व्यवसायाची तिसरी पिढी आहेत. त्यांच्या मते, निर्यात परवानगी मिळणे हे त्यांच्या कुटुंबाचे अनेक दशकांचे स्वप्न होते. आजोबा आणि वडिलांनीही यासाठी प्रयत्न केले, मात्र यश मिळाले नव्हते. दीर्घकाळ चाललेल्या पाठपुराव्यानंतर अखेर पाकिस्तान सरकारकडून हिरवा कंदील मिळाला, असे त्यांनी सांगितले.
 
पूर्वी इस्लामाबादच्या डोंगराळ भागात असलेली मुरी ब्रुअरी आता रावळपिंडीमध्ये विस्तारली आहे. विशेष म्हणजे हा कारखाना पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या निवासस्थानाच्या जवळ असून, हा परिसर देशातील सर्वाधिक सुरक्षित भागांपैकी एक मानला जातो. यामुळेही या निर्णयाबाबत चर्चा रंगल्या आहेत. राजकीय विश्लेषक फासी झका यांच्या मते, पाकिस्तानचे दारूशी असलेले नाते दुटप्पी आहे. सार्वजनिक पातळीवर विरोध आणि बंदी असली, तरी प्रत्यक्षात देशात दारूचे अस्तित्व आणि वापर मोठ्या प्रमाणात आहे. बंदीपूर्व काळात मुरी ब्रुअरी भारत, अफगाणिस्तान, आखाती देश आणि अमेरिकेतही आपली उत्पादने पाठवत होती.
सध्या कंपनीचा मुख्य उद्देश तात्काळ नफा कमावणे नसून, पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात आपले स्थान निर्माण करणे हा आहे. सुमारे २,२०० कर्मचाऱ्यांना रोजगार देणारी ही कंपनी जाहिरातींवर निर्बंध असल्याने शांतपणे, दर्जेदार उत्पादनावर भर देत काम करत आहे. मुरी ब्रुअरी बिअर, व्हिस्की, वोडका यांसह नॉन-अल्कोहोलिक पेयेही तयार करते. पाकिस्तानमध्ये मुस्लिमांसाठी दारू बेकायदेशीर असली, तरी देशातील सुमारे २४ कोटी लोकसंख्येपैकी अंदाजे ९० लाख नॉन-मुस्लिम नागरिकांना कायदेशीररित्या दारू खरेदीची परवानगी आहे. इस्लामिक देशाच्या चौकटीत काम करत असूनही, मुरी ब्रुअरीने अनेक दशकांपासून आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. आता निर्यातीला मिळालेल्या परवानगीमुळे पाकिस्तानच्या आर्थिक आणि सामाजिक चर्चेत नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे.