मुंबई :
prajakta mali टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जाणारा बिग बॉस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हिंदी ‘बिग बॉस’चे १९वे पर्व नुकतेच संपल्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नवीन सीझनमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच अभिनेत्री प्राजक्ता माळीने या शोविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठी मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून प्राजक्ता माळीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात भक्कम स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतच ती एक यशस्वी व्यावसायिक आणि निर्माती म्हणूनही ओळखली जाते. सोशल मीडियावरही ती सातत्याने सक्रिय असून चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर प्रश्नोत्तरांचा (Q&A) सेगमेंट आयोजित केला होता.या दरम्यान एका चाहत्याने तिला थेट प्रश्न विचारला की ती ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात सहभागी होणार आहे का. या प्रश्नावर प्राजक्ताने कोणतीही दिरंगाई न करता अवघ्या दोन शब्दांत उत्तर दिले—“कधीही नाही.” तिच्या या स्पष्ट आणि ठाम उत्तरामुळे ती स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यास prajakta mali इच्छुक नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.महत्त्वाचे म्हणजे, याआधी प्राजक्ता माळी ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाली होती, मात्र स्पर्धक म्हणून नव्हे. ‘फुलवंती’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती अभिनेता गश्मीर महाजनीसोबत शोच्या मागील सीझनमध्ये गेस्ट म्हणून घरात गेली होती. त्यामुळे तिचा शोशी संपर्क असला, तरी स्पर्धक म्हणून सहभागी होण्याबाबत ती सुरुवातीपासूनच नकारात्मक असल्याचे दिसते.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाबाबत अद्याप अधिकृत स्पर्धकांची यादी जाहीर झालेली नाही. मात्र प्राजक्ता माळीच्या स्पष्ट भूमिकेमुळे तिच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तिचे चाहते तिला विविध माध्यमांतून पाहण्यास उत्सुक असले, तरी ‘बिग बॉस’च्या घरात मात्र ती दिसणार नाही, हे आता नक्की झाले आहे.