एमपीएससीच्या 'त्या' विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात!

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
मुंबई,
sharad-pawar-for-students महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी भरती जाहीर केली असली, तरी या प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे काही उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे. यामुळे एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आणि ‘संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी, अशी मागणी त्यांनी मांडली. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असला, तरी अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, असेही त्यांनी पवार यांना कळवले.
 

sharad pawar and mpsc student 
शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे, परंतु गृहविभागांतर्गत येणाऱ्या PSI पदासाठी फक्त एक वर्षाची सवलत देण्यात विलंब का होत आहे? विद्यार्थ्यांची मुख्य मागणी अशी आहे की, शासनाने तात्काळ पीएसआय पदासाठी ही एक वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी. तसेच, पीएसआय पदासाठीची जाहिरात प्रकाशित होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाला आणि वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शेवटची संधी हुकली आहे.
 
उमेदवारांनी मागणी केली आहे की, वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरला जावा. शरद पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सांगितले की, ही मागणी न्याय्य असून शासनाने याचा सकारात्मक विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य न्याय द्यावा. दरम्यान, एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब) २०२५ मध्ये एकूण ६७४ पदे जाहीर झाली असून त्यापैकी पोलिस उपनिरीक्षकांसाठी ३९२ पदांचा समावेश आहे. परीक्षेत वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एकवेळची विशेष संधी देण्याची मागणीही उमेदवारांकडून केली जात आहे. शरद पवार यांनी स्पष्ट केले की, शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गंभीरपणे विचार करून योग्य निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे.