सामायिक शेतजमिनीत बेकायदेशीर घरकुल

भावाच्या विरोधात भावाचे उपोषण

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी,
illegal-housing : सामायिक मालकीच्या ओलिताखालील शेतजमिनीत कोणतीही संमती न घेता बेकायदेशीररीत्या घरकुलाचे बांधकाम करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत एका भावाने आपल्या सख्ख्या भावाविरोधात उपोषणास्त्र उगारले आहे. संजय उद्धव भोयर (रा. चिखली ईजारा ता. आणी) असे उपोषणकर्त्याचे नाव आहे. त्यांची चिखली येथील शेतजमिन सामायिक मालकीची आहे. ही जमीन ओलिताखाली असताना, त्यांचा सख्खा भाऊ श्रीकृष्ण भोयर यांनी घरकुलाचे बांधकाम केलेले आहे. अर्जदाराची कोणतीही लेखी अथवा तोंडी संमती न घेता संबंधितांनी घरकुलाचे बांधकाम केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, घरकुलासाठी ग्रामपंचायत स्तरावरून खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाभ मंजूर करण्यात आल्याचा संशयही अर्जदाराने व्यक्त केला आहे.
 
 

y25Dec-Bhoyar 
 
 
 
वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने, अखेर तहसील कार्यालय, आर्णी येथे सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. आता प्रशासन चौकशी कुणाची करते व कोणत्या भावाला न्याय मिळवून देते हे पाहणे महत्त्वाचे ठरते. शिवसेनेचे कृषी समन्वयक प्रमोद कुदळेसह जिल्हा संपर्कप्रमुख रवी राठोड यांनी उपोषण मंडपाला भेट दिली व उपोषण कर्त्याची व्यथा समस्या जाणून घेतली. गटविकास अधिकारी रमेश खरोडे, नायब तहसीलदार उदय तुंडलवार व अधिकाèयांनीही भेट दिली व संजय भोयरशी चर्चा केली. या त्यांनी, आम्ही चौकशी केली आहे. आता ती जागा कोणाची आहे त्याची तपासणी व जागेची मोजणी करून जर कोणी दोषी असेल तर त्यावर कारवाई करु, असे सांगितले. परंतू यावर संजय भोयर यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी आपले उपोषण सुरू ठेवले आहे.
प्रशासनाकडे उत्तर नाही का ?
 
 
या प्रकरणी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत सचिव यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करूनही घरकुल मंजुरीसंदर्भातील अधिकृत कागदपत्रे अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागणी करूनही माहिती न मिळाल्याने, विविध प्रश्नांची निर्मिती झाली. आपल्या मालकी हक्कांवर अन्याय होत असल्याचा आरोप संजय भोयर यांनी केला आहे. सामायिक शेतजमिनीत बेकायदेशीर बांधकाम झाले असल्यास त्याची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच संबंधित सर्व कागदपत्रे अर्जदारास उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.