चंद्रपूर,
sudhir-mungantiwar : चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक-2025 येत्या 15 जानेवारीला होऊ घातली आहे. आजवरच्या सार्या निवडणुकीचे नेतृत्व भाजपा म्हणून मुनगंटीवार यांच्याकडेच असायचे. यंदा मात्र भाजपातील नेत्यांची गटबाजी जरा जोरात आहे. निवडणुकीचे नेतृत्व कुणाकडे असेल आणि कोण उमदेवार ठरवतील, याबाबत संभ्रम निर्माण होत होते. अशावेळी पक्षातील वरिष्ठांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न असला, तरी याही निवडणुकीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून आ. मुनगंटीवार यांच्याकडेच धुरा सोपवली गेली आहे.
त्यामुळे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनातच ही निवडणूक होईल हे स्पष्ट झाले आहे. संघटन अधिक सुदृढ करणे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नियोजनबद्ध व प्रभावीपणे पार पाडणे या दृष्टीने प्रदेश भाजपकडून त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसेचअधिकृत नियुक्तीपत्र जाहीर करून, या निर्णयाला अधोरेखित केले आहे.
सोबतच आमदार चैनसुख संचेती यांची निवडणूक निरीक्षक म्हणून, माजी खासदार अशोक नेते यांची निवडणूक प्रभारी म्हणून, तर आ. किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी नियोजनबद्ध, समन्वयित आणि गतिमान अभियान उभारले जाण्याची शक्यता वाढली आहे. तसेच गटबाजीचे ग्रहण निवडणुकीपुरते का असेना, संपण्याच्या मार्गावर आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करणारे आ. मुनगंटीवार हे या निवडणुकीचे प्रमुख प्रेरणास्त्रोत ठरणार आहेत. अफाट लोकसंपर्क, कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारे निर्णयक्षम नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. महानगरपालिका निवडणूक ही केवळ राजकीय स्पर्धा नसून, चंद्रपूरच्या पुढील पाच वर्षांच्या विकास आराखड्याचा पाया आहे, असा दूरदर्शी दृष्टिकोन त्यांनी मांडला असून, आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात संघटनेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.