चर्चसमोर केले हवन आणि हनुमान चालीसा!

ख्रिसमसच्या दिवशी हिसारमध्ये तणाव

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
हिसार,
Tension in Hisar on Christmas Day हरियाणातील हिसार शहरात ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर धार्मिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, १६० वर्षे जुन्या सेंट थॉमस चर्चच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने चर्चसमोरील क्रांतीमान पार्कमध्ये धार्मिक कार्यक्रम घेण्याची घोषणा केल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात वज्रवाहने, पाण्याच्या तोफा आणि पोलिसांच्या तीन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
 
 

hisar 
ख्रिसमसच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदू शक्ती संगम’ या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमांतर्गत चर्चसमोर हवन करण्याचा आणि हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरण्यात आला आहे. यावर शहरातील अनेक नागरिक आणि स्थानिक रहिवाशांनी आक्षेप नोंदवत या कार्यक्रमाचा निषेध केला असून, तो रद्द करण्याची मागणी केली आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने दोन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, महानगरपालिकेने या कार्यक्रमाचे लावलेले पोस्टर हटवले असून, अद्याप लटकलेले झेंडे काढून टाकण्याचीही मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ख्रिसमसच्या दिवशी दुपारी क्रांतीमान पार्कमध्ये ‘हिंदू शक्ती संगम’ कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात बजरंग दलाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होणार असून, स्वामी श्रद्धानंद यांच्या शहीद दिनानिमित्त हवन आणि श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. याशिवाय विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी दोन वाजता हनुमान चालीसा पठणास सुरुवात होऊन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमांना मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक किशन प्रजापती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. याच दरम्यान, चर्च परिसरातही ख्रिसमसच्या पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याने एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती राहणार आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कडक सुरक्षाव्यवस्था केली आहे. हिसार पोलिसांच्या माहितीनुसार, क्रांतीमान पार्क, चर्च परिसर आणि आसपासच्या भागात दोन डीएसपी, दोन पोलीस निरीक्षक, ४० ते ५० महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह सुमारे २५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस सतर्क आहेत.