अक्रा,
The world ends today. घानामध्ये ख्रिसमसच्या दिवशी जगाचा अंत होणार असल्याच्या अफवेमुळे मोठी खळबळ उडाली. २५ डिसेंबर रोजी एका व्यक्तीने केलेल्या खळबळजनक भविष्यवाणीमुळे हजारो नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांनी जीव वाचवण्यासाठी थेट समुद्रकिनाऱ्याचा मार्ग धरला. देवाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या एबोह नोहा नावाच्या व्यक्तीने, ख्रिसमसच्या दिवशी मुसळधार पाऊस आणि भीषण पूर येऊन संपूर्ण जग नष्ट होईल, असा दावा केला होता. एबोह नोहाने आपल्याला थेट देवाकडून संदेश मिळाल्याचे सांगत, या आपत्तीतून वाचण्यासाठी केवळ त्याने तयार केलेल्या बोटीत आश्रय घेणे हाच एकमेव मार्ग असल्याचे जाहीर केले.
स्वतःची तुलना बायबलमधील नोहाशी करत त्याने एक मोठी बोट तयार केली आणि तिला ‘नोहाचे जहाज’ असे नाव दिले. या बोटीत जो आश्रय घेईल, तोच विनाशातून बचावेल, असा त्याचा दावा होता. या भविष्यवाणीवर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने लोक समुद्रकिनाऱ्यावर जमा झाले. काही ठिकाणी तर लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये शेकडो लोक घाईघाईने त्या बोटीकडे जाताना दिसत आहेत. अनेकांनी या बोटीत आधीच जागा आरक्षित केल्याचा दावाही केला होता. एबोह नोहाने ही भाकिते काही काळापासून करत असल्याने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आणि हळूहळू नागरिकांमध्ये भीती पसरत गेली.
दरम्यान, तज्ज्ञ आणि विवेकी संघटनांनी या दाव्यांना पूर्णपणे अंधश्रद्धाळू आणि भ्रामक ठरवत नागरिकांना घाबरू नये, असे आवाहन केले आहे. कोणताही वैज्ञानिक किंवा नैसर्गिक आपत्तीचा इशारा नसताना अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले. तरीही या खळबळजनक भविष्यवाणीमुळे घानाच्या अनेक भागांत काही काळ तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.