उस्मान हादींच्या मारेकऱ्याचा साथीदाराला अटक!

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
ढाका,
Usman Hadi's killer has been arrested बांगलादेशातील युवा नेता आणि इन्कलाब मंचचा प्रमुख प्रवक्ता शरीफ उस्मान बिन हादी यांच्या हत्याकांडात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित आणि मुख्य हल्लेखोराचा साथीदार हिमोन रहमान शिकदार याला उत्तर ढाकामधील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. तो उस्मान हादी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मोटारसायकलस्वार आलमगीरचा जवळचा सहकारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
 

osman hadi murder 
पोलिस सूत्रांनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीनंतर उत्तर ढाकातील अदाबर परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकण्यात आला. तेथे लपून बसलेल्या हिमोन रहमानला ताब्यात घेण्यात आले. अटकेदरम्यान त्याच्याकडून एक परदेशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, फटाके, बंदुकीची पावडर तसेच कच्चे बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सध्या हिमोनची सखोल चौकशी सुरू असून या कटामागे असलेल्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या हत्याकांडातील मुख्य आरोपी फैसल करीम मसूद मात्र अद्याप फरार आहे. शरीफ उस्मान बिन हादी हे बांगलादेशातील राजकारणात उदयोन्मुख आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व मानले जात होते. गेल्या वर्षी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात जोरदार आंदोलन उभारले होते. शेख हसीना सरकारविरोधात झालेल्या हिंसक विद्यार्थी आंदोलनांमध्ये ते आघाडीवर होते. या आंदोलनांमुळे देशात मोठी राजकीय उलथापालथ झाली आणि अखेर शेख हसीना यांना देश सोडावा लागला, तर त्यांचे सरकार कोसळले.
 
 
उस्मान हादी यांच्या हत्येमुळे बांगलादेशातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. विशेषतः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घटनेने मोठी खळबळ उडवली आहे. २०२४ मधील शेख हसीना सरकारविरोधी विद्यार्थी चळवळीतील हादी हे महत्त्वाचे नेतृत्व होते. त्यांच्या मृत्यूमुळे देशातील अंतरिम सरकारसमोर कायदा आणि सुव्यवस्थेचे गंभीर आव्हान उभे राहिले असून, या हत्येचा संपूर्ण कट उघडकीस आणण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.