आर्वी,
sumit-wankhede : साधारणत: निवडणुकीनंतर प्रत्येकच पक्षात वाद होत असतात. तोच वाद भाजपातही झाला. परंतु, ते सार्वजनिक होणे दुर्देवी आहे. येथील भाजपातील काही नेत्यांचा प्रभाव या निवडणुकीत होता त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता. तोच काल उफाळून आला. परंतु, त्यातून शरद पवार गट आणि काँग्रेससोबत भाजपातील काही नेत्यांची असलेली छुपी युती जनतेपुढे आली असल्याची प्रतिक्रिया आ. सुमित वानखेडे यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता व्यत केली.
आ. वानखेडे पुढे म्हणाले की, आर्वीत गेल्या काही वर्षांपासुन राजकारण वेगळ्या वाटेवर गेले आहे. नगर पालिका निवडणुकीतून तो वाट चव्हाट्यावर आला. त्याचा निषेध म्हणून आज शहरात मोर्चा काढण्यात आला. ज्यांनी निवडणुकीत मदत केली, त्यांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठीच आजचा हा मोर्चा काढला गेला, असा टोला आ. वानखेडे यांनी लगावला.
काल रात्री आर्वीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी आ. दादाराव केचे यांना अडवून भाजप उमेदवारांविरोधात प्रचार का केला? असा जाब विचारला होता. या घटनेचा संदर्भ देत सुमित वानखेडे म्हणाले की, ही घटना निश्चितच दुर्दैवी आहे. निवडणुकीनंतर असे वादाचे विषय होत असतात. मात्र हे विषय पक्षाच्या स्तरावर मिटवता आले असते. पण ते सार्वजनिक रित्या चव्हाट्यावर आले, हे पक्षासाठी चांगले नाही.
निवडणूक काळात भाजपच्या काही नेत्यांनी बजावलेली भूमिका संशयास्पद होती. आज आर्वीत निघालेल्या मोर्चावर टीका करताना वानखेडे म्हणाले की, आजचा मोर्चा हा भाजपचा नसून तो तुतारी आणि काँग्रेसचा होता. निवडणुकीत या पक्षांनी भाजपच्या काही नेत्यांना जी मदत केली, त्या मदतीची परतफेड करण्यासाठीच आज हा मोर्चा काढण्यात आला आहे. या निमित्ताने भाजपचे काही नेते आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांची छुपी युती आता जनतेसमोर उघडी पडली आहे. हिच छुपी युती गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झाली होती. याचेही पितळ या घटनेमुळे उघडच झाल्याची चर्चा आर्वीत चांगलीच रंगली आहे.
विधान परिषद आमदार दादाराव केचे यांच्या विरोधात पक्षांतर्गत असंतोष आता चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चाकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती. मोर्चात भाजपचे निष्ठावान चेहरे दिसण्याऐवजी, नेहमीच भाजपाचा विरोध करणारे विरोधक अधिक सक्रिय दिसत होते. यामुळे सामान्य जनतेमध्येही संभ्रमाचे वातावरण होते. स्वतःची चूक लपवण्यासाठी आणि विरोधकांना बळ देण्यासाठी हा बंदचा बनाव रचल्याची चर्चा आर्वीत सुरू आहे. यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात मोठी खळबळ माजली असून, पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे