गडचिरोली,
Gadchiroli UIT inauguration, गडचिरोलीमध्ये तांत्रिक शिक्षणाच्या नव्या वाटा उघडणार्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (युआयटी) या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार, 27 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. आरमोरी रोडवरील युआयटी कॅम्पस येथे होणार्या या सोहळ्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार असून शहराच्या शैक्षणिक इतिहासातील हा महत्त्वाचा क्षण मानला जात आहे.
याप्रसंगी वित्त, नियोजन, कृषि, राहत व पुनर्वसन, विधी आणि न्याय मंत्री आशीष जयस्वाल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत श्रीधर बोकारे आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालासुब्रमणियम प्रभाकरन हे विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.गडचिरोलीत तांत्रिक शिक्षणाचा विस्तार, स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी दालने उपलब्ध करणे आणि उद्योग-शैक्षणिक सहयोगाला चालना देणारी महत्त्वपूर्ण पहल म्हणून युआयटीची स्थापना होत असून यामुळे जिल्ह्यात रोजगार आणि औद्योगिक संधींच्या दिशेने सकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला गडचिरोली वासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. युआयटीच्या माध्यमातून गडचिरोलीत तांत्रिक प्रगतीचे नवे पर्व सुरू होण्याच्या दिशेने ही सुरुवात महत्त्वाची ठरणार आहे.