चंद्रपूर,
himanshu-bhardwaj : किडनी विक्री प्रकरणातील आरोपी हिमांशु भारद्वाज (रा. चंदीगढ, पंजाब) याच्या पोलिस कोठडीत 29 डिसेंबरपर्यत वाढ करण्यात आली आहे.
हिमांशु भारद्वाज हा कंबोडियात किडनी विक्रीसाठी पीडितांना सोबत करीत होता. त्यास पोलिसांनी चंदीगडहून अटक केल्यानंतर 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची पोलिस कोठडी संपताच न्यायालयाने त्याच्या कोठडीत 29 डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.
शेतकरी रोशन कुळे यांच्या किडनी विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सावकार मनिष पुरुषोत्तम घाटबांधे (42, रा. पटेल नगर, ब्रम्हपुरी) यास गुरूवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर किडनी विक्रीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा मुख्य आरोपी रामकृष्ण मल्लेशम सुंचू (36) उर्फ ‘डॉ. क्रिष्णा’ याच्या पोलिस कोठडीत 29 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील तरूण शेतकरी रोशन शिवदास कुळे यांनी सावकारी कर्जापायी आपली किडनी कंबोडियात विकली होती. हे प्रकरण उघडकीस येताच, ब्रम्हपुरी पोलिसांनी कर्जदारांची अमानुष पद्धतीने आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक केल्याप्रकरणी 6 अवैध सावकरांविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यातील 5 आरोपींना तात्काळ अटक झाली. मात्र, आरोपी मनिष घाटबांधे पुढील सात दिवस फरार होता. पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली. वैद्यकीय तपासणी करून गुरूवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
किडनी विक्रीच्या रॅकेटचा आरोपी रामकृष्ण मल्लेशम सुंचू (36) जो, ‘डॉ. क्रिष्णा’ नावाने पीडितांच्या संपर्कात होता, त्याला 25 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली होती. त्याची पोलिस कोठडी संपताच, न्यायालयाने त्याच्या कोठडीत 29 डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.