वर्धा,
Shalarth ID scam शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शासनाची फसवणूक करणार्या तब्बल २७ आरोपींना आतापर्यंत तपास यंत्रणेने बेड्या ठोकल्या आहेत. यात नजिकच्या नालवाडी येथील रवींद्र काटोलकर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. काटोलकर यांच्यासह अटक करण्यात आलेल्या आरोपींनी शासनाची फसवणूक करून मोठी मालमत्ताही गोळा केली आहे. या आरोपींची मालमत्ता न्यायालयाच्या आदेशान्वये तपास यंत्रणा जप्त करीत त्याच्या लिलावातून गुन्ह्याच्या अनुषंगाने ‘रिकव्हरी’ करु शकते, असे कायदे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आतापर्यंत तपास यंत्रणांनी २७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणातील अटकेतील २७ वा आरोपी रवींद्र काटोलकर यांची यांना गुरुवार २५ रोजी नागपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूचा युतिवाद लक्षात ऐकल्यावर काटोलकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. रिमांडमध्ये असताना काटोलकर यांच्या स्वाक्षरीचे काही वेतन देयके तपास यंत्रणेने जप्त केली. तर तब्बल ३९ बोगस शालार्थ आयडी असलेल्या शिक्षकांना नियमित व थकीत वेतन अदा करून शासनाची १२ कोटींहून अधिकची फसवणूक करण्यात आल्याचेही तपासात पुढे आले आहे. ज्या शिक्षकांना देयक अदा करण्यात आली त्यांच्याकडून रक्कम जमा करण्याची शयता वर्तवण्यात येत आहे. न्यायालयाकडून हिरवी झेंडी मिळताच नालवाडी भागात असलेला रवींद्र काटोलकर यांचा टोलेजंग बंगल्यावर जप्तीची शयता नाकारता येत नाही.
रवींद्र काटोलकर पूर्वी साईनगर भागात एका भाड्याच्या घरात राहत होते. त्यानंतर त्यांनी नालवाडी भागात बंगला बांधला. काटोलकर यांची जिल्ह्याबाहेर अमरावती, नागपूर आदी ठिकाणीही स्थावर मालमत्ता असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात रंगत आहे.