मोरेश्वर बडगे
thackeray brothers महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच काही घडतंय. एकत्रीकरणाचे वारे फिरतेय. राजकीय पक्ष एकत्र येत आहेत. काँग्रेसला स्वबळ आठवले आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या उबाठा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे यांच्या महापालिका निवडणूक युतीची घोषणा झाली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन गट पुण्यात एकत्र येत आहेत. ठाकरे बंधूंचे एकत्रीकरण हा प्रीतिसंगम आहे, असे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात हा ‘भीतिसंगम’ आहे. भाजपाच्या भीतीने दोन चुलत भाऊ एकत्र आले आहेत. 2019 मध्ये आणि नंतर सत्तेच्या राजकारणाने खूप तोडफोड पाहिली. भाजपाला सोडून उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि काँग्रेसकडे जाऊन बसले. त्यांनी महाआघाडीचे सरकार बनवले. अडीच वर्षातच ते कोसळले. शिवसेना फुटली. 40 आमदारांसह बंड करून एकनाथ शिंदे यांनी सत्तेचे नवे गणित बसवले. नंतर अजितदादा पवार यांनी काकांविरुद्ध तलवार उपसली. तेही आपल्या आमदारांसह महायुतीकडे आले. अशा हवेत कित्येक वर्षांनंतर महापालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत.
त्या पृष्ठभूमीवर पुन्हा उलथापालथ होत आहे. तोडलेले, तुटलेले नेते पुन्हा एकत्र येत आहेत. मुंबईतले जागावाटप ठाकरे बंधू अजून जाहीर करू शकलेले नाहीत. बंडखोरी होऊ नये म्हणून अखेरच्या टप्प्यात ते जाहीर केले जाईल असे दिसते. तिकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणजे काका-पुतण्या एकत्र काम करणार म्हणत आहेत. ते ‘घड्याळा’वर लढणार की ‘तुतारी’वर याची उत्सुकता असेल. अजितदादा हे महायुती सरकारमध्ये भाजपासोबत असले, तरी पुण्यात भाजपाच्या विरोधात लढणार आहेत. त्याच वेळी मुंबईत भाजपासोबत त्यांची चर्चा सुरू आहे. शरद पवारांचा पक्षही अन्यत्र ठाकरे सेना आणि काँग्रेससोबत आघाडीला उत्सुक आहे. भांडून वेगळे झालेले हे पक्ष एकत्र का येत आहेत हा प्रश्न मतदारांना नक्कीच पडला असणार. त्यांना भाजपाची भीती आहे का? सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपाची अवस्था शनी शिंगणापूरसारखी आहे. शनी शिंगणापूरला दरवाजे सदैव उघडे असतात. निवडणुका जाहीर झाल्या असतानाही भाजपाने इनकमिंग थांबवलेले नाही. भाजपाचे तिकीट म्हणजे विजयाची गॅरंटी. त्यामुळे साऱ्याना भाजपाचे तिकीट हवे आहे. ‘एक फूल, पचास माली’ अशी परिस्थिती आहे. अशा प्रकारची निवडणूक प्रथमच लोक पाहात आहेत. काय होणार?
किती वातावरण पेटवले होते विरोधकांनी? अनेक महिने मनोज जरांगे पाटील चालवले. बच्चू कडू यांना शेतकरी नेते केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी व्होट चोरी, ईव्हीएममधली गडबड तसेच मतदार याद्यांचा गोंधळ हे मुद्दे लावून धरले होते. मतदार याद्यांमधला घोळ दूर झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असे खुद्द राज ठाकरेंनी जाहीर केले होते. पण निवडणुका जाहीर होताच ठाकरे बंधू सारे विसरले आणि चूपचाप निवडणुकीच्या कामाला लागले. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीच्या निकालांनी विरोधकांची तोंडं बंद केली. जिंकले तर लोकांनी जिंकवले आणि हरले तर निवडणूक आयोग काम करतो असे म्हणायचे. नगर परिषद निवडणुकीच्या निकालांनी विरोधकांचा दुटप्पीपणा उघडा पडला. उद्धव ठाकरे नगर परिषद निवडणूक हरले, असे म्हणायची सोय नाही. कारण ते निवडणूक लढलेच नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पालथा घातला. विकास कामांच्या जोरावर मतं मागितली. कोमट पाणी पिऊन निवडणूक जिंकता येत नाही, हे ठाकरेंनी समजून घेतले पाहिजे. तुम्ही घराच्या बाहेरच पडणार नाही तर मग लोकांकडून कसली अपेक्षा बाळगता? ‘अकेला देवेंद्र क्या करेगा?’ असे सुप्रिया सुळे एकेकाळी म्हणाल्या होत्या. अकेला देवेंद्र काय काय करू शकतो ते पाच वर्षांत राज्याने पाहिले. नगर परिषद निवडणुकीची त्यांची रणनीती तर मास्टरस्ट्रोक होती. विरोधकांची जागा संपवण्याची रणनीती यशस्वीपणे राबविली गेली. महायुतीतले घटक पक्ष भांडत नव्हते, भांडल्यासारखे दाखवत होते. विरोधकांना अखेरपर्यंत हा गेम समजलाच नाही.
मराठी आणि मराठी माणसाच्या मुद्यावर ठाकरे बंधू ही निवडणूक लढवणार आहे. मराठी अस्मितेच्या मुद्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे बंधूंनी म्हटले आहे. त्यात नवे काही नाही. यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही. गेली 25 वर्षे शिवसेना मराठीचाच मुद्दा चालवत आली आहे. दिल्लीला मुंबईचे तुकडे पाडायचे आहेत, हा ठाकरे कुटुंबाचा आवडता आरोप. अगदी बाळासाहेब ठाकरे हेही हेच बोलत. ‘फुटाल तर संपाल’ या शब्दात यावेळी राज ठाकरे कडाडले आहेत. इतकी वर्षे ठाकरे कुटुंबाकडे मुंबईची सत्ता होती. काय केले यांनी मराठी माणसासाठी? यांच्याच काळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. महापालिकेचे ठेके कोणाला दिले? यांचे बिझनेस पार्टनर कोण? हे तपासले तर यांचे बेगडी मराठी प्रेम लक्षात येते. मराठीचा एवढा कळवळा आहे तर राज्यसभेवर पाठवायला यांना अमराठी माणूसच का दिसतो? ठाकरे बंधूंनी आता ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ सुरू केले आहे. निवडणूक त्यांना भावनात्मक लाटेवर न्यायची आहे. हे काम ते वर्षनुवर्षे करत आले आहेत, पण आता मराठी माणूस भुलणार नाही. मुळात ठाकरे बंधू किती भावनाप्रधान आहेत? ते शुद्ध हिशोबी आहेत. ठाकरे बंधू मराठी अस्मितेसाठी नाही, तर स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र आले आहेत. अन्यथा जे भाऊ 20 वर्षे एकत्र येऊ शकले नाहीत त्यांना आज एकत्र यायची गरज वाटावी असे काय आभाळ कोसळले होते? ठाकरे शरद पवारांकडे गेले तेव्हाच ‘ठाकरे ब्रँड’ संपला होता. पित्याचे कडवे हिंदुत्व सोडून मुस्लिमांचे लांगूलचालन सुरू केले तेव्हा ‘ठाकरे ब्रँड’ संपला होता.thackeray brothers खऱ्या अर्थाने हे दोन भावांचे मनोमिलन नाही. गड वाचवण्याची ही धडपड आहे; पण उशीर झाला. मराठी माणूस हा ‘कालचा’ राहिलेला नाही. आजचा मराठी माणूस शिकला आहे. नोकरीसाठी इंग्रजी शिकावे लागते हे त्याला उमगले आहे. आजचा मराठी माणूस स्वतःकडे ‘हिंदू’ म्हणून आधी बघतो. हिंदुत्वाला बाधा आणणाऱ्या शक्ती त्याला अजिबात पसंत नाहीत. त्यामुळे ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून जी चर्चा चालते तो ब्रँड चालण्याची किंवा धावण्याची शक्यता दूर दूरपर्यंत नाही. उद्धव ठाकरे यांची मदार मुस्लिम मतांवर आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना मुस्लिम मतं मिळाली. आपण ‘मुस्लिम हृदयसम्राट’ झालो असे त्यांना वाटते. म्हणून यावेळी उद्धव ‘ममू फॉर्म्युला’ चालवू पाहत आहेत. म म्हणजे मराठी आणि मु म्हणजे मुस्लिम. मुंबईत मराठी टक्का 38 टक्के आहे आणि मुस्लिम टक्का 20 ते 23 आहे. पण मुस्लिम मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होणार आहे. काँग्रेस तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांना हेच काम करायचे आहे. निवडणुका चौरंगी करण्याचा भाजपाचा डाव भाजपाचा गेमप्लॅन यशस्वी झाला आहे. ठाकरे सेना आली तर एखादा खान महापौर होऊ शकतो, असे सांगून भाजप नेते अमित साटम यांनी आग लावलीच आहे. आता मुंबई महापालिका एका कुटुंबाचा व्यवसाय नाही असे भाजपाकडून सांगितले जात आहे. तुम्ही लिहून ठेवा. ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक शेवटची असेल.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)