नेत्यांनीच विझवली ‘उबाठा’ गटाची मशाल

नगरसेवकांचे पक्षनेतृत्वावर आरोप

    दिनांक :26-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-news : शिवसेना (उबाठा) गटाच्या नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी विश्रामगृहात पत्रपरिषद घेऊन पक्षातील वरिष्ठ पदाधिकाèयांवर आणि नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. पराभूत उमेदवारांनी पक्ष नेतृत्वातून सहकार्य न मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘मशाल’ (पक्षाचे चिन्ह) पूर्णपणे विझवण्यामागे कोणाची महत्त्वाची भूमिका आहे, असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे.
 
 
 
y26Dec-Press
 
 
 
यावेळी नेत्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. यात उमेदवारांनी ‘उबाठा’ पक्षाचे सर्व पदाधिकारी, खासदार संजय देशमुख, जिल्हा प्रमुख किशोर इंगळे आणि जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड व पक्षाचे नेते संतोष ढवळे यांची ‘नार्को टेस्ट’ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
 
 
महाविकास आघाडी झाली हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर झाले होते, मग अचानक महाविकास आघाडी का तुटली, आघाडी तोडण्यामागे सर्वात महत्त्वाचे निर्णय कोणाचे आहेत, यावर पराभूत उमेदवारांसमोर स्पष्टीकरण द्यावे, नेत्यांची निवडणूक आली की सर्व एक होतात. कार्यकर्त्यांची निवडणूक आली की हा ‘त्याचा’ आणि तो ‘माझा’ असा भेदभाव का केला जातो, कार्यकर्त्यांनी केवळ सतरंजी उचलण्याचेच काम करावे का, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
 
 
बाळासाहेब चौधरी (माजी नप अध्यक्ष) निवडणुकीच्या काळात कुठेच का दिसले नाहीत, खासदारांजवळ झेंडे देण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते, तर निवडणुका का लढविल्या, एक रुपयाही पार्टी फंड मिळाला नाही. मग या सर्व लोकांनी पक्षाला संपवण्याचे काम केले का, असा प्रश्न पराभूत उमेदवारांनी उपस्थित केला. खासदारांच्या जिल्ह्यात मशाल का नाही पेटली, खासदार जिल्ह्यातून असूनही एकही मशाल का पेटली नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
 
 
या सर्व पराभूत उमेदवारांनी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेत्यांना भेटून सर्व बाजू मांडणार असल्याचे सांगितले आहे. या पत्रपरिषदेत शहरप्रमुख अतुल गुल्हाने, मनीष लोळगे, शुभम तोलवानी, मंदा भिवगडे, रवी राऊत, बाळू नाईक व श्रद्धा लोळगे उपस्थित होते.