वाशीम,
Washim Marathi Sahitya Sammelan, साहित्य आणि संस्कृतीचा प्रबुद्ध वारसा लाभलेल्या वाशीमच्या मातीत साहित्याचे आणि कलेचे मोठे सामर्थ्य आहे. या मातीची साहित्यिक वाटचाल दैदीप्यमान आहे. वत्सगुल्म जिल्हा मराठी संमेलन हे त्याचेच एक निदर्शक आहे, असे प्रतिपादन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी आज, २६ डिसेंबर रोजी केले. स्थानिक एसएमसी शिक्षण संकुल परिसरात झालेल्या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, संमेलनाध्यक्ष अशोक मानकर, संमेलन समिती अध्यक्ष तथा एसएमसी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, सचिव पुरुषोत्तम शर्मा, राजस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश झंवर, कारंजाच्या विद्याभारती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. पी.आर. राजपूत, प्राचार्य डॉ. विजय पांडे, प्राचार्य मीना उबगडे, यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाला अनुसरून,जिल्हास्तरावर होत असलेल्या साहित्य संमेलनांना प्रशस्ती द्यायला हवी असे सांगून उद्घाटक प्रदीप दाते पुढे म्हणाले की, जिल्हा संमेलनामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये राहणार्या लेखक वाचकांना व्यासपीठ मिळत आहे. त्यामुळे मराठी साहित्याचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन होत आहे. लेखक, कलावंत आणि श्रोत्यांना ही एक खास पर्वणी आहे. एक भव्य दिव्य सम्मेलन आयोजित केल्याबद्दल एसएमसी शिक्षण प्रसारक मंडळाचे त्यांनी कौतुक केले.
संमेलनाचे प्रास्ताविक करीत भूमिका मांडताना ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे म्हणाले, वत्सगुल्म जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन थाटात झाले. एकूणच शासकीय अनुदानातून मराठी भाषा संवर्धन आणि विकास या उद्देशाने हे संमेलन आयोजित केले आहे. वाशीम जिल्ह्यात लेखन करणारांची संख्या फार मोठी आहे.त्यातही लेखनासंदर्भातील क्रीम म्हणून पुढे येऊ पाहणार्या नवोदित कवी-लेखकांना सन्माननीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाही या संमेलनाच्या आयोजनामागे उद्देश आहे.तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असा विश्वास बाबाराव मुसळे यांनी व्यक्त केला. दीप प्रज्वलन आणि सावित्री मातेच्या प्रतिमेचे पूजन करून संमेलनाला प्रारंभ झाला. सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या संगीत विभागाने स्वागत गीत सादर केले.प्राचार्य डॉ. राजपूत, प्राचार्य डॉ.ओमप्रकाश झंवर यांची समायोचित भाषणे झाली. प्रा. गजानन वाघ यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. विजय पांडे यांनी उद्घाटन सत्राचे आभार मानले. कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
एक वत्सगुल्म वाणी स्मरणिकेचे प्रकाशन नांदेडच्या साह्यास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या संमेलनाच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रा.डॉ. विजय मेरसिंग जाधव यांनी या स्मरणिकेचे संपादन केले आहे. या स्मरणिकेत वाशीमच्या पत्रकारितेचा इतिहास, वीरशैव साहित्य आणि महानुभाव साहित्याचा धांडोळा, वाशीमच्या कवितेचा प्रवास, संघाची १०० वर्षे, अभिजात मराठीची भविष्यकालीन वाटचाल, अशा विविधांगी लेखांचा समावेश आहे. यासोबतच दिगंबर इंगळे यांच्या तू चाल पुढे या कवितासंग्रहाचे आणि मधुराणी बनसोड यांच्या पाळणा प्रबोधनाचा या दोन पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.
दोन ग्रंथदिंडीने वेधले वाशिमकरांचे लक्ष !
संमेलनाच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने यावेळी वाशीमकरांचे लक्ष वेधले. ग्रामदैवत बालाजी मंदिरातून ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी हिरवा झेंडा दाखवून ग्रंथ दिंडीचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, राज्य ग्रंथालय परिषदेचे सदस्य प्रभाकर घुगे, ज्येष्ठ साहित्यिक धोंडूजा इंगोले, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथदिंडीत बाकलीवाल शाळेचे एनसीसीचे विद्यार्थी, संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण मंडळाचे विद्यार्थी वारकरी, एसएमसी इंग्लिश स्कूल आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा सहभाग होता.चित्रकला प्रदर्शनीला प्रतिसाद !संमेलनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील जवळपास ५० चित्रांचे प्रदर्शन संमेलन स्थळी भरवण्यात आले. वाशीम जिल्ह्यातील सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या अनुषंगाने रेखाटलेल्या या चित्रांना भरभरून प्रतिसाद मिळाला.