भंडाऱ्यात 'सुमनोहर सेलिब्रेशन लॉन'वर पुरवठा विभागाचा छापा, 7 सिलेंडर जप्त

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर उघड

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
 भंडारा,
supply-department-raid : जिल्ह्यातील खात रोडवरील 'सुमनोहर सेलिब्रेशन लॉन' येथे घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदा व्यावसायिक वापर होत असल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी दुपारी टाकलेल्या छाप्यात एकूण ८ सिलिंडर जप्त करण्यात आले असून, संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
 
 
J
 
 
 
जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी भंडारा यांच्या नेतृत्वात सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे, सुहास टोंग, पोचिराम कापडे, चक्षुपाल भिमटे यांच्या पथकाला सुमनोहर सेलिब्रेशन लॉनमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास पथकाने या ठिकाणी अचानक छापा टाकला.
 
 
 
छाप्या दरम्यान लॉनच्या किचनची तपासणी केली असता, तेथे उपस्थित असलेले अनिल मारोतराव चव्हाण, वय ६८, रा. भंडारा यांना पथकाने कारवाईचे प्रयोजन स्पष्ट केले. किचनमध्ये सर्व बर्नर एका पाईपद्वारे जोडलेले आढळले. या ठिकाणी एच.पी.सी.एल. कंपनीचे १ भरलेले, १ अर्धवट भरलेले आणि इतर ६ रिकामे, असे एकूण ८ सिलिंडर आढळून आले.
 
 
घरगुती वापराचे गॅस सिलेंडर व्यावसायिक कामासाठी वापरण्याबाबत पथकाने चव्हाण यांच्याकडे परवाना किंवा आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पुरवठा विभागाने दोन पंचाच्या समक्ष पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे व संध्याकाळी उशिरा पोलीस स्टेशन भंडारा येथे अत्यावशक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3, 7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
 
यापुढे कोणीही घरघुती गॅस चा व्यावसायिक वापर करू नये. जर अश्या प्रकारे घरघुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असल्याचे अढळल्यास संबंधितावर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा यांनी केले.