गडचिरोलीच्या इतिहासाचे पहिले पान यु.आय.टी.च्या माध्यमातून लिहिले जाईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
गडचिरोली, 
devendra-fadnavis : गडचिरोलीच्या इतिहासाचे पहिले पान यु.आय.टी.च्या माध्यमातून लिहिले जाईल. इथून क्लास वन आणि क्लास टू दर्जाचे अधिकारी निर्माण होतील, उत्तम दर्जाचे मानव संसाधन तयार होईल आणि स्थानिक तरुणांना उच्च पगाराच्या नोकर्‍यांची नवी दारे उघडतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गोंडवाना विद्यापीठ व लॉयड्स मेटल्स यांच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारीत अडपल्ली (गडचिरोली) येथे स्थापन झालेल्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (युएटीआय/युआयटी) या संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
 
 
CM
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासात्मक उपक्रमांमुळे आज गडचिरोलीचा चेहरा मोहरा बदलत आहे. राज्याच्या शेवटचा आणि मागास जिल्हा ही ओळख पुसून गडचिरोली राज्याच्या पटलावर नवी ओळख निर्माण करत आहे. गोंडवाना विद्यापीठ व लॉयड्स मेटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेली युआटी ही संस्था जागतिक दर्जावर स्पर्धा करणारे अधिकारी आणि संशोधक घडवेल. उद्योगांना थेट लागणारे मनुष्यबळ तयार करणारे हे केंद्र म्हणजे जिल्ह्याच्या प्रगतीतील भक्कम टप्पा असून, लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांनी 25 कोटी रुपयांचे योगदान देऊन हा प्रकल्प उभा करण्यास मोलाची साथ दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
 
 
 
फडणवीस पुढे म्हणाले की, गडचिरोलीमध्ये उद्योगांची उभारणी पर्यावरणपूरक पद्धतीनेच केली जाईल. गडचिरोली हरित आहेच. मात्र हा जिल्हा अजून हरित करण्यासाठी पाच कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. गडचिरोलीत लवकरच एअरपोर्टच्या कामाला सुरुवात होईल आणि एअरपोर्ट झाल्यानंतर गडचिरोली ‘गेटवे टू साउथ इंडिया’ म्हणून विकसित होईल. जागतिक नकाशावर या जिल्ह्याचे नाव नवीन उंचीवर पोहोचेल, असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी गोल्ड मेडल मिळवणार्‍या श्‍वेता कोवे हिचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
 
गोंडवाना विद्यापीठ जागतिक दर्जाचे संशोधन करणारे केंद्र बनविण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले. गोंडवाना विद्यापीठ मागास राहिलेले नाही, तर राज्यातील पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून ओळख निर्माण झाले आहे. लॉयड्स मेटल्सचे बी. प्रभाकरण यांनी केलेल्या सहकार्यामुळे युआयटी संस्थेत स्वतःचे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले असून स्टील, मायनिंग व औद्योगिक तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम विकसित करण्यात आले आहेत. स्थानिक उद्योगांना आवश्यक भक्कम मनुष्यबळ पुरविणारे हे पहिले विद्यापीठ ठरत आहे, असे बोकारे म्हणाले.
 
 
यावेळी वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असल्याचा सूर यावेळी उमटला.