लतिश शरणागतचा वीर बाल सन्मानपत्राने गौरव

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
गोंदिया,
latish-sharanagat : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिनानिमित्त तालुक्यातील चुलोद येथील लतिश छन्नीलाल शरणागत याला वीर बाल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. एक वर्षापूर्वी त्याने तलावाच्या पाण्यात बुडणार्‍या आपल्या शाळेतील वयाने लहान विद्यार्थ्याला स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता वाचविले होते.
 
 
LK
 
२६ डिसेंबर ही तारीख गुरू गोविंदसिंग यांच्या साहिबजादा जोरावरसिंग व फतेहसिंग यांच्या अतुलनीय शौर्य व बलिदानाच्या स्मरणार्थ वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. सरकारने हा राष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला आहे. हा दिवस बालकांच्या धैर्याचे व विश्वासाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. लहान मुलांना साहस, सत्य, धर्मनिष्ठा व राष्ट्रप्रेमाचे महत्व समजावे, या उद्देशाने या दिवशी वील बालकांचा गौरव केला जातो. या गौरवाच्या मालिकेत तालुक्यातील चुलोद येथील लतिश शरणागत याला स्थान मिळाले आहे. त्याने आपल्या साहस, ध्यैर्याने, जीवाची पर्वा न करता शाळेतील सहपाठीचा जीव वाचविला. तो चुलोद येथील मैत्रीय विद्यालयाचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी असून त्याच्या शाळेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी कृष्णा रामेश्वर ठाकूर हा घटनेच्या दिवशी म्हशी घेऊन तलावावर गेला होता. प्रसंगी लतिश हा जवळच होता.
 
 
दरम्यान, कृष्णा हा म्हशी घेऊन तलावात उतरला असता पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच लतिशने क्षणाचाही विलंब न करता, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली व कृष्णाला सुखरूप बाहेर काढले. ही घटना कळल्यास घरचे रागवतील म्हणून लतिशने घरी वा इतर कुठेही याबाबत सांगितली नाही. परंतु शाळेपर्यंत त्याच्या शौर्याची माहिती पोहचली. दरम्यान यावर्षी गोंदियाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे वीर बाल दिवसानिमित्त वीर बालकांचा शोध घेत असताना लतिशच्या शौर्यगाथेची माहिती संस्थेला विद्यार्थ्यांकडून मिळाली. संस्थेच्या शिक्षकांनी माहितीची सहनिशा केल्यावर संस्थेतर्फे त्याचा २६ डिसेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्रालयाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या स्वाक्षरीचे वीर बाल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.