जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणतात ‘त्या’ फाईल्सचा शोध सुरू

-गैरप्रकाराची सावरासावर करण्याचा प्रयत्न -प्रकरण नाविन्यपूर्ण योजनेतील घोळाचे

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
गोंदिया, 
gondia-news : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदियातर्फे २०२३-२३ वर्षात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनेत १ कोटीचा घोळ व २०२४-२५ वर्षातही १.२५ कोटीचा गैरप्रकार झाल्याचे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्राप्त माहितीतून पुढे आले आहे. दोन्ही वर्षातील योजनेचे उपक्रम राबविण्यासाठी ई-निविदेच्या माध्यमातून पुणे व नागपूर येथील संस्थेची निवड करण्यात आली. यातील घोळ माहितीच्या अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीत पुढे आला. तर, या प्रकरणाच्या निविदा प्रक्रियेच्या फाइल्स क्रीडा विभागाच्या कार्यालयातून गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
 
 
K
 
 
 
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदियातर्फे २०२२-२३ या वर्षात राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण योजनेत १ कोटी रुपयांचा घोळ झाल्याचे पुढे आले. सन २०२४-२५ या वर्षातही १.२५ कोटीचा गैरप्रकार झाल्याचे माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त माहितीतून पुढे आले. राज्याच्या युवा धोरणात प्राधान्य बाबींमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. युवा धोरणांतर्गत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे अपेक्षित असताना केवळ कागदोपत्री उपक्रम राबविल्याचे दाखवून निधीवर दोन्ही संस्थांनी कोट्यावधीचा डल्ला मारला. विशेष म्हणजे उपक्रम राबविणारी यंत्रणा असलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी विभागाने सुध्दा निवड केलेल्या संस्थेने कोणत्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची निवड केली, त्याची साधी यादी मागविली नाही. स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप कुणाला केले, याची चाचपणी केली नाही.
 
 
 
हा सर्व प्रकार माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीत पुढे आल्यानंतर आता क्रीडा विभागात खळबळ उडाली असून, प्रकरणाची सावरासावर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेच्या फाइल्सच क्रीडा विभागाच्या कार्यालयात नसल्याची माहिती आहे. ही बाब जिल्हा क्रीडा विभागाकडे माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत केलेल्या अर्ज संदर्भात माहिती जाणून घेण्याकरिता संबंधित अर्जदार गेले असता उघडकीस आली. यावेळी स्वतः प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी माहिती असलेल्या फाईलचा फाइल्सचा शोध सुरू असून, त्यासाठी आठ-दहा दिवसांचा कालावधी माहिती अधिकार अर्ज करणार्‍याला मागितला असून तसे पत्रही दिले आहे. विशेष म्हणजे व्यायाम शाळांना साहित्य वाटपातील घोळ प्रकरणी तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांना निलंबित करण्यात आले होते. हे निविदेचे प्रकरणही त्यांच्याच कार्यकाळातील आहे. त्यामुळे क्रीडा विभागातील हा घोळ आता या विभागाच्या काही अधिकार्‍यांच्या अंगावर येण्याची शक्यता आहे.
 
 
गैरप्रकाराची सारवासारव करण्यासाठी धावपळ
 
 
माहितीच्या अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील घोळ पुढे आला. यानंतर ज्या संबंधित संस्थांना कामे देण्यात आले होते. त्या संस्थेचे पुणे व नागपूर येथील कर्मचारी तर पुणे येथील वेद, इरा, रिशा व आरुल प्रकाशनाचे मालक पुस्तक विक्री साठी शुक्रवारपासून गोंदियात डेरेदाखल आहेत.
 
 
गोंदियाच्या क्रीडा अधिकारी कार्यालय होते सुरू
 
 
नाविन्यपूर्ण योजनेतील फाईल गहाळ झाल्यानंतर त्या फाईल यांच्या शोध घेण्यासाठी गोंदिया येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय दिवसभर सुरू होते. विशेष म्हणजे यावेळी वाहनांसह नागरिकांची वर्दळ पहावयास मिळाली.
 
 
आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, माझ्याकडे सालेकसा व गोंदिया तालुका क्रीडा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. कार्यालयाकडे माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अर्ज प्राप्त झाले आहेत, हे प्रकरण तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यकाळतील असल्यामुळे माहितीचा शोध सुरू असून अर्जदारास आठ-दहा दिवसाची मुदत मागितली आहे.
- अनिराम मरसकोल्हे
प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी, गोंदिया