अमरावतीत महायुतीचे जागावाटप रखडले

पालकमंत्री येणार अमरावतीत

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
अमरावती, 
chandrashekhar-bawankule : येथील महापालिका निवडणुकीसाठी भाजपा, शिंदे सेना व युवा स्वाभिमान पार्टी या महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात येत असतानाच पुन्हा रखडले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपाचे राज्य निवडणूक प्रमुख व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवारी अमरावतीत येणार आहे. बैठक झाल्यानंतर दुपारी ४ वाजता अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
 
 
AMT
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुका युतीतच लढण्याचा निर्णय घेतला असला तरी अमरावतीत अद्यापही तोडगा निघालेला नाही. महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा चर्चा केल्या पण जागावाटपाला ते अंतिम स्वरूप देऊ शकले नाही. शिंदे सेनेतल्या एका नेत्याच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अजून मार्ग निघाला नसल्याची माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुषार भारतीय यांच्या निवासस्थानी मनपा निवडणूक व रखडलेल्या युतीच्या जागावाटपा संदर्भात भाजपाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. चर्चेत ठरल्यानुसार युतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी खुद्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवारी दुपारी १२ वाजता अमरावतीत येणार आहे. ४ वाजेपर्यंत महायुतीतल्या घटकपक्षांशी चर्चा करून जागावाटपाला ते अंतिम स्वरूप देण्याची शक्यता आहे. काही मार्ग निघाला नाही तर महायुती तुटण्याची शक्यता काहींनी वर्तविली आहे. कोणताही एक निर्णय रविवारी जाहीर होणार असल्याचे सांगितल्या जात आहे.
 
 
 
राज्यात महायुतीत असलेला राष्ट्रवादी अजित पवार गट अमरावतीत महायुतीत नाही. त्या ऐवजी युवा स्वाभिमान पार्टी आहे. राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे. माहितीनुसार, मनपाच्या ८७ जागांपैकी ७६ जागांवरच महायुतीची वाटपाची चर्चा होत आहे. यातल्या १४ जागा शिवसेनेला व ६ जागा युवा स्वाभिमानला देण्याची भाजपाची तयारी आहे. उर्वरीत ५६ जागेवर भाजपा लढू शकतो. तसे पहिले तर भाजपासाठी ही संख्या फारच कमी आहे. कारण, भाजपाने गेल्या निवडणुकीत ७६ जागा लढवल्यावर ४५ नगरसेवक विजयी झाले होते. यंदा ५६ जागा जर भाजपा लढवेल तर किती नगरसेवक विजयी होईल, हा मोठा प्रश्न भाजपासमोर आहे.
 
 
२५ दाखल, ३१६ अर्जांची उचल
 
 
महापालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज चौथा दिवस होता. २५ नामांकन अर्ज दाखल झाले. तर ३१६ अर्जांची उचल झाली. आतापर्यंत २६९४ अर्ज इच्छुकांनी घेतले असून २८ अर्ज दाखल झाले आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवार्‍या जाहीर झाल्यानंतरच दाखल अर्जाची संख्या वाढणार आहे. रविवारी सुटी आहे. सोमवार व मंगळवार या दोन दिवसात सर्वाधिक अर्ज दाखल होतील.