नागपूरचा पारा १० अंशावर; थंडीच्या कडाक्याने होणार नवीन वर्षाचे स्वागत

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
नागपूर, 
nagpur-temperature : उत्तर भारतातील थंड वार्‍यामुळे किमान तापमानात घसरण कायम असून नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्याने होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर अनेक शहरांचे तापमान ९ ते १३ अंशापर्यंत आहे. नव्या प्रारंभी गारठा राहणार असून १ जानेवारी नंतर पारा वाढण्याची शक्यता आहे. उत्तरेतील हिमालय परिसरात बर्फवृष्टीचे प्रमाण कमी तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात पुन्हा बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याने गारठा वाढणार आहे. उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा कमी अधिक होत आहे.
 
 
new year


सौजन्य: AI PHOTO
 
नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. थंडीची तिव्रता कायम असल्याने तिबेटीयन स्वेटर बाजारात स्वेटर खरेदीसाठी गर्दी झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा ऊनी कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली असल्याची माहिती स्वेटर विक्रेत्यांनी दिली आहे. वाजवी किमतीत दर्जेदार उणी कपडे मिळत असल्याने तिबेटीयन स्वेटर मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ असते.