नववर्षारंभाला ३०० मंदिरात होणार हनुमान चालीसा पठण

*संजीव लाभे यांची पत्रपरिषदेत माहिती

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
वर्धा,
hanuman-chalisa-recitation : जगात शांतता नांदावी, नवे वर्ष सर्वांना सुख समाधानाचे जावे, परस्परांमध्ये प्रेम व सहकार्य असावे, सृष्टीतील सर्व जीव आनंदित असावे, यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी एकाचवेळी शहर व परिसरातील मंदिरांमध्ये हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील १६ वर्षांपासून हा उपक्रम निरंतर सुरू असून यंदा ३०० मंदिरात एकाचवेळी हनुमान चालीसा पठण होणार असल्याची माहिती श्रीराम शोभायात्रा समितीचे उपाध्यक्ष संजीव लाभे यांनी आज शनिवार २७ रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 

K  
 
संजीव लाभे पुढे म्हणाले की, सर्वांचा वर्षारंभ हा मंगलमय वातावरणात व्हावा, हा या उपक्रमाचा हेतू आहे. मागील वर्षी २७७ मंदिरांमध्ये हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. यावर्षी ३०० मंदिरांमध्ये पठणाचा उद्देश्य ठेवण्यात आला असून यासाठी प्रचार, प्रसार सुरू करण्यात आला आहे. वर्धा शहराचे २० भाग केले असून प्रत्येक मंदिरांशी ५ ते १० कार्यकर्ते संपर्क साधत आहेत. त्याद्बारे प्रत्येक मंदिरांमध्ये फ्लेस लावले आहेत. त्या-त्या मंदिर व्यवस्थापनाला पत्रेही दिल्या गेली. प्रत्येक मंदिरात १० ते २० भतांनी पठणाचा कार्यक्रम घ्यावा, यासाठी हनुमान चालिसाची पत्रकेही सर्व मंदिरांना देण्यात आली आहे. वर्धेतील श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू असल्याने मुख्य कार्यक्रम महादेवपुरा येथील प्राचीन महादेव मंदिराच्या सभागृहात होणार असल्याचेही लाभे यांनी सांगितले.
 
 
यावर्षी वर्धेसह लगतच्या बोरगाव, इंझाळा, सेलू काटे, सावंगी, सालोड, नागठाणा, रोठा, उमरी, गणेशपूर, भिवापूर, पांढरकवडा, पिपरी, कारला, साटोडा, आलोडी, महाकाळ, नालवाडी, म्हसाळा, वरूड, सेवाग्राम, नांदुरा, गोजी, बरबडी, धानोरा, चितोडा, भूगाव आदी गावांशीही संपर्क सुरू आहे. तर जिल्ह्यातील सेलू, सिंदी रेल्वे, समुद्रपूर, हिंगणघाट, देवळी, पुलगाव, आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुयातील मान्यवरांनाही विनंती करून अधिकाधिक गावांमध्ये हा कार्यक्रम घेऊन वर्धा जिल्हा हा महाराष्ट्रात मॉडेल ठरावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यत केली.
 
 
पत्रकार परिषदेला श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष अरूण काशीकर, सचिव राजेंद्र उमाटे, श्रीराम मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र लुले, सचिव विजय धाबे, कमल कुलधरीया आदींची उपस्थिती होती.
 
 
३ हजार ८७४ मुलांनी दिली परीक्षा
 
 
श्रीराम शोभायात्रा समिती आणि श्रीराम मंदिर देवस्थानच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत असतो. मागीलवर्षी कुमारांच्या साहस कथा या विषयांवर सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तर यावर्षी भारतीय वैज्ञानिक परिचय या विषयावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश हायस्कूलच्या चार केंद्रावरून ही परीक्षा घेण्यात आली असून ३ हजार ८७४ विद्यार्थी यात सहभागी झाले होते. श्रेणीनुसार प्रथम, द्बितीय येणार्‍या विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात येणार असून सहभागी सर्व विद्यार्थ्यांनाही रामनवमी नंतर प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती लाभे यांनी यावेळी दिली.