चंद्रपूर,
omprakash-shah-madhav-bavge : यंदाचा बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार-2026 हा पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील ज्येष्ठ विचारवंत ओमप्रकाश शहा यांना घोषित झाला आहे. तर बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्काराकरिता लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते माधव बावगे यांची निवड करण्यात आली आहे.
ओमप्रकाश शहा यांनी आयुष्यभर गांधी विचारांनी प्रेरित होऊन कार्य केले आहे. एक ज्येष्ठ विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी बाबा आमटे यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो सायकल अभियानाचे ते पुर्वांचल व पश्चिम बंगालचे समन्वयक होते. राष्ट्रीय एकात्मतेसाठीच्या प्रयत्नात ते आजही सक्रिय आहेत. 1 लाख रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे.
यापूर्वी या पुरस्काराने लोकसेवक संघाचे माजी सरचिटणीस सत्यापाल ग्रोवर (2023), तर दक्षिण भारतातील गांधी विचारांचे कार्यकर्ते आर. सुंदरेसन (2024), युवक क्रांती दलाचे प्रणेते डॉ. कुमार सप्तर्षी (2025) यांना गौरविण्यात आले होते.
तसेच बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून, यंदा हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते लातूर येथील माधव बावगे यांना घोषित करण्यात आला आहे. ते भारत जोडो सायकल यात्री, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्याध्यक्ष, भारत जोडो युवा अकादमीचे संस्थापक सचिव असून, त्यांना राष्ट्रीय एकात्मतेसाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार देखील मिळाला आहे. लातूर येथील सुप्रसिध्द शाहू कॉलेजचे ते विद्यार्थी व पुढे त्याच कॉलेजमध्ये कार्यालयीन अधीक्षक व स्वायत्त झाल्यावर निबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले. समताधिष्ठीत समाज निर्मितीसाठी ते क्रियाशील असतात. राष्ट्र सेवा दल, छात्रभारती व अंधश्रध्दा निर्मुलन समिती अशा चळवळीचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत.
विविध क्षेत्रात कार्य करणार्यांचा सन्मान
बाबा आमटे यांच्या संकल्पनेतील भारत जोडो सायकल यात्रा अभियानाला जवळपास 37 वर्ष पूर्ण झाले आहेत. या अभियानातील युवा-युवतींना एकत्र येऊन बाबा आमटे एकता अभियान ट्रस्ट नुकताच स्थापन केला आहे. बाबा आमटे यांच्या नावे राष्ट्रीयस्तरावर जीवनगौरव पुरस्कार व एक सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. जीवनगौरव पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.