पलाना येथील शेतकरी सिंचनापासून वंचित

खोटी कारणे देऊन विद्युत लाईन रोखल्याचा आरोप

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
कारंजा लाड
Palana farmers, तालुयातील पलाना येथील शेतकर्‍यांना खोटी कारणे पुढे करून आजतागायत विद्युत पुरवठा न देताच सिंचनापासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योती गणेशपुरे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली आहे.
 


Kohlapuri dam 
निवेदनात म्हटले आहे की, पलाना येथील शेतकर्‍यांनी सन २०१६-—१७ मध्ये अधिकृतरीत्या कोटेशन भरून सिंचनासाठी विद्युत पुरवठ्याची मागणी केली होती. मात्र, तब्बल आठ —नऊ वर्षे उलटूनही विद्युत पुरवठा करण्यात आला नाही. संबंधित अधिकार्‍यांकडून सदर लाईन वनविभागाच्या हद्दीत येते असे कारण देण्यात आले. मात्र, हे कारण पूर्णतः खोटे व दिशाभूल करणारे असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. शेतकर्‍यांकडे उपलब्ध असलेल्या अधिकृत नकाशानुसार वनविभागाचे सर्वे नंबर वेगळे असून, शेतकर्‍यांचे सर्वे नंबर वेगळे आहेत. तसेच ज्या रस्त्यामार्गे विद्युत लाईन जाणार आहे, तो पलाना ते राजुरा घाटे हा रस्ता वनविभागाच्या अखत्यारित येत नसल्याचे नकाशावर स्पष्ट दिसते. रस्त्याच्या आजूबाजूला वनजमीन असली तरी सदर रस्ता वनविभागाचा नसल्याचे नोंदी दर्शवतात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तरीसुद्धा खोटी माहिती देत शेतकर्‍यांच्या सर्वे नंबरमधून विद्युत लाईन ओढण्यात आलेली नसल्याने शेतकर्‍यांना जाणीवपूर्वक सिंचनापासून वंचित ठेवण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.
शेती हा उपजीविकेचा एकमेव आधार असून, पाण्याअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या प्रकरणी अधिक्षक अभियंत्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून नकाश्याची पडताळणी करावी व तात्काळ विद्युत लाईन देऊन सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी व दोषी अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात आली आहे.