तुरीचे पीक बेफाम मात्र, श्वापदांचा हैदोस वाढला

*भीतीपोटी रात्रीची गस्त बंद

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
pigeon-pea-crop-wild-animal : गत पंधरवड्यात पडलेल्या जोरदार थंडीमुळे यंदा तुरीचे पीक बेफाम बहरले आहे. सर्वत्र पिवळी फुलं आणि तुरीच्या कोवळ्या शेंगांनी शेतशिवार सजले. पण, जंगली श्वापदांचा त्रास वाढला. त्यात भर घातली बिबट्याच्या हजेरीने! त्यामुळे भीतीपोटी रात्रीची जागलीही बंद झाली आहे.
 
 
ज KJ
 
 
मागील पाच वर्षांच्या काळात यावर्षी प्रथमच तुरीचे पीक बहरलेले दिसत असून यंदा प्रत्येक शेतात निरोगी तुरीचे पीक दिसते. त्यातही काही शेतकर्‍यांनी संकरित आणि भरपूर उत्पन्न देणार्‍या वाणांची लागवड केल्याचे दिसून येत आहे. गत पंधरवड्यात पडलेल्या कडायाच्या थंडीत तुरीच्या शेतात शेंगा पकडल्याचे दिसून येते. परंतु, यावर्षी जंगली रोही, रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. दिवसभर शेतकरी त्यांचा बंदोबस्त करेलही, पण रात्री येणार्‍या श्वापदांचे काय? त्यातच बिबट्याच्या दहशतीची भर पडली. रात्री पहारा घालायचा विचार केला तर बिबट्या केव्हा, कुठे आणि कधी दिसेल याचा नेम नाही. त्यामुळे शेतकरी बांधवानी यंदा तुरीचे पीक रामभरोसे सोडले आहे. नजिकच्या बरबडी, कवठा शिवारात वाघोबाचे दर्शन झाल्यामुळे कापूस वेचायला जाणार्‍या महिला मजूर शेतमालक हजर नसेल तर शिवारात जाण्यास नकार देतात, अशी खंत व्यत केली आहे. बहुतांश शेतकरी आणि मजूर देखील वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे सातच्या आत घरी येताना दिसतात.