तिवसा,
rabi-crop : सध्या तिवसा तालुक्यासह परिसरात गुलाबी थंडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून, ही थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी संजीवनी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः हरभरा आणि गहू या प्रमुख रब्बी पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधानाचे भाव उमटले आहेत. निसर्गाची साथ लाभत असल्याने यंदाचा रब्बी हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने आशादायी ठरेल, असा विश्वास शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.

गुलाबी थंडीमुळे हवेत आवश्यक ती आर्द्रता टिकून राहत असून, रात्रीची थंड हवा आणि दिवसा सौम्य उष्णता ही हरभरा व गहू पिकांच्या वाढीस अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या अनुकूल वातावरणामुळे पिकांची जोमदार वाढ होत असून कणसांची भर चांगली येत असल्याचे शेतकरी सांगतात. तसेच या काळात रोगराईचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता असल्याने उत्पादन वाढीचा विश्वास शेतकर्यांना वाटत आहे. मात्र केवळ वातावरण अनुकूल आहे, म्हणून निष्काळजीपणा चालणार नाही, असे अनुभवी शेतकरी व कृषी तज्ज्ञांचे मत आहे. पिकांचे योग्य नियोजन, वेळेवर पाणी व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर, कीड व रोगांवर नियंत्रण तसेच खर्चाचे काटेकोर आर्थिक नियोजन हे घटक उत्पादनावर मोठा परिणाम करतात. योग्य शेती पद्धती अवलंबल्यासच निसर्गाची साथ फलदायी ठरते, असे शेतकरी स्पष्टपणे सांगतात.
काही शेतकर्यांच्या मते, निसर्ग फक्त साथ देतो; मात्र पीक भरभरून येण्यासाठी शास्त्रीय शेती पद्धतींचे पालन आवश्यक आहे. हरभरा पीक जमिनीत नत्र स्थिरीकरणास मदत करत असल्याने पुढील हंगामातील पिकांसाठी जमिनीची सुपीकता वाढते. त्यामुळे हरभरा हा केवळ चालू हंगामापुरता मर्यादित न राहता पुढील वर्षीच्या शेती नियोजनासाठीही फायदेशीर ठरत आहे.
तिवसा तालुका कृषी अधिकारी हेमलता इंगळे म्हणाल्या की , रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांसाठी कृषी विभागाकडून व्हॉट्सअॅपद्वारे वेळोवेळी पीक संगोपन व कीड-रोगांची माहिती दिली जात आहे. शेतकर्यांनी या सूचनांचे काटेकोर पालन करून शेतीचे नियोजन करावे. रोगांची लक्षणे दिसताच त्वरित शिफारशीनुसार उपाययोजना कराव्यात .योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होईल.