रिसोड,
Resod police, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना रिसोड पोलिसांनी अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.प्राप्त माहितीनुसार २४ डिसेंबर रोजी अमोल प्रकाश खिल्लारे (वय २८) रा. पुसेगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली यांनी रिसोड पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती की, २३ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सेनगाव रोडवरील घोन्सर फाट्याजवळ दोन अनोळखी इसमांनी मारहाण करून ९७ हजार रुपयांची दुचाकी, ७ हजार रुपये नगदी व १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. अशा फिर्यादवरून दोन अनोळखी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना रिसोड पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी डी.बी. पथकास दिल्या होत्या. त्यानंतर डी. बी. पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पध्दतीच्या माध्यमातून व गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपीचा शोध घेत सदर गुन्ह्यात दोन आरोपींना सेनगाव रोडवरील फुटाणा फॅटरी परिसरातून ताब्यात घेवून विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, सहायक पोलिस अधीक्षक नवदिप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डी. बी. पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले, श्रीकिसन नागरे, मनोहर वानखेडे, रवी अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोने यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास रिसोड पोलिस करीत आहेत.