पारायण सोहळा अन् शिवमहापुराणने होणार नववर्षारंभ

*मयूर महाराज दरणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
new-year-celebration : जागतिक पारायण सोहळा समिती, वर्धाच्या वतीने संत गजानन महाराज जागतिक पारायण सोहळ्याचे आयोजन ११ जानेवारी २०२६ रोजी शहरातील सर्कस मैदानावर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. विश्वशांती, आत्मशांती व मन:शांती या हेतून आयोजित या जागतिक पारायणात जास्तीत जास्त भतांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मयूर महाराज दरणे यांनी आज शनिवार २७ रोजी आयोजित पत्रपरिषदेत केले.
 
 
JK
 
यावेळी कार्यक्रमाची माहिती देताना अविनाश वंजारी यांनी सांगितले की, यंदा जागतिक पारायणाचे दहावे वर्ष आहे. ग्रंथवाचक विजया जगदाळे व श्वेता पाचखेडे यांच्या उपस्थितीत चार हजारांहून अधिक महिला-पुरुष गजानन भत पारायणात सहभागी होणार आहे. भतांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी आरोग्यसेवा, रुग्णवाहिका व अग्निशमन सेवा उपलब्ध असून, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सुमारे ५०० स्वयंसेवक विविध सेवांसाठी तैनात राहतील. ज्येष्ठ भतांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
 
 
पारायणात सहभागी होणार्‍या महिलांसाठी ड्रॉ द्वारे ५१ साड्यांचे वाटप करण्यात येईल. तसेच भतांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी हिंगणघाट, सेलू व वर्धा शहरातून वाहनसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच प्रियदर्शिनी महिला विकास संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड. शीतल पंकज भोयर यांच्या हस्ते होईल. सर्व संत गजानन महाराजांचे सेवक-सेविकांनी या धार्मिक अनुष्ठानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला चंदू राठी, खुशाल गुंडतवार, अविनाश वंजारी, राजू वंजारी, राजू चाफले, गजेंद्र कापडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
 
 
९ रोजी कीर्तन, १० रोजी ग्रंथदिंडी
 
 
जागतिक पारायणपूर्वी शुक्रवार ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मयूर महाराज दरणे यांचे कीर्तन व हरिपाठ होणार आहे. १० जानेवारी रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत भव्य ग्रंथदिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या पालखी दिंडीचा सर्कस मैदानातून निघून शहर भ्रमण करून पुन्हा सर्कस मैदानात समारोप होईल. यात विविध भागांतील २५ दिंड्या तसेच शेगावहून विशेष दिंडी सहभागी होणार आहे. यावेळी शेगावीचा राणा चित्रपटात संत गजानन महाराजांच्या भूमिकेत झळकलेले अभिनेता अमित पाठक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
 
 
१३ ते २० जानेवारी शिवमहापुराण कथा
 
 
जागतिक पारायणानंतर त्याच ठिकाणी १३ ते २० जानेवारी दरम्यान शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात येणार आहे. कथावाचक समाधान महाराज शर्मा असून अधिकाधिक भाविक भतांनी या कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.