बँकॉक
thailand cambodia disputed थायलंड कंबोडिया वादग्रस्त सीमाभागात भगवान विष्णूची मूर्ती पाडल्याच्या घटनेवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, थायलंड सरकारने यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे. या कारवाईमागे सुरक्षा आणि क्षेत्र व्यवस्थापनाची गरज होती, हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा ठाम दावा थायलंडने केला आहे.
वादग्रस्त सीमाभागातील कारवाई
थायलंडच्या निवेदनानुसार, ही मूर्ती चोंग आन मा या वादग्रस्त थाई-कंबोडियन सीमाभागात उभारण्यात आली होती. थाई अधिकाऱ्यांचा आरोप आहे की, कंबोडियन सैनिकांनी थाई हद्दीवर बेकायदेशीरपणे सार्वभौमत्वाचा दावा करण्यासाठी ही मूर्ती उभारली होती. त्यामुळे थायलंडच्या नियंत्रणाखालील भागात पुन्हा सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
थाई सैन्याने बॅकहोल लोडरच्या साहाय्याने भगवान विष्णूच्या मूर्तीचे नुकसान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर वाढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, थाई-कंबोडियन सीमा प्रेस केंद्राने निवेदन जारी करत स्पष्ट केले की, “या कृतीचा उद्देश कोणत्याही धर्माचा, श्रद्धेचा किंवा पवित्र प्रतीकांचा अपमान करणे नव्हता. ही कारवाई पूर्णपणे सुरक्षा आणि क्षेत्र नियंत्रणाच्या दृष्टीने करण्यात आली.”
कंबोडियाचा विरोधाभासी दावा
दरम्यान, एएफपी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, प्रेह विहार प्रांताचे प्रवक्ते लिम चानपान्हा यांनी दावा केला की, ही मूर्ती कंबोडियन हद्दीत होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०१४ मध्ये उभारण्यात आलेली ही विष्णूची मूर्ती सोमवारी थायलंडच्या सीमारेषेपासून सुमारे १०० मीटर अंतरावर पाडण्यात आली. कंबोडियाने असा आरोपही केला आहे की, ही मूर्ती बौद्ध आणि हिंदू अनुयायांकडून पूजली जाणारी धार्मिक जागा होती.
भारताचा तीव्र निषेध
या घटनेवर भारतानेही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. थाई सैन्याने हिंदू देवतेची मूर्ती पाडल्याच्या कथित घटनेचा भारताने बुधवारी अधिकृत निषेध केला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, “अशा अपमानकारक कृतींमुळे जगभरातील अनुयायांच्या भावना दुखावतात आणि असे प्रकार घडू नयेत.”
भारताने थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांना संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गाने संघर्ष सोडवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळता येईल.
संघर्षाची पार्श्वभूमी
थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावाद जुलै महिन्यात पुन्हा उफाळून आला होता.thailand cambodia disputed अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धविराम झाला असला, तरीही या महिन्यात संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याचे चित्र आहे.