यवतमाळ नगर परिषदेत जनतेचा कौल ‘विकासालाच'..!

माजी मंत्री मदन येरावार ठरले ‘किंगमेकर’

    दिनांक :27-Dec-2025
Total Views |
समीर मगरे

यवतमाळ,
Yavatmal Municipal Council election यवतमाळ नगर परिषदेची निवडणूक उमेदवारांसह नेत्यांसाठीही प्रतिष्ठेची झाली होती. विरोधकांकडून माजी मंत्री मदन येरावार यांना लक्ष्य करून नगर परिषदेवर आपली सत्ता कशी येईल, यावर भर दिला होता. मात्र, विधानसभेत जी चूक झाली ती पुन्हा नको म्हणत मदन येरावार यांनी जी विकास कामे केली, ती डोळ्यांसमोर ठेवून यवतमाळकरांनी साथ दिल्याने मदन येरावार या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरले आहेत.
 

 Yavatmal Municipal Council election results 
यवतमाळ नगर परिषदेत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, उबाठा सेनेसह इतर सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. विरोधकांकडून काही झाले तरी यवतमाळ नगर परिषदेवर पुन्हा भाजपाची सत्ता येणार नाही. यासाठी साम-दाम-दंड-भेदचे सर्व प्रयोग करण्यात आले.त्यातही या निवडणुकीत माजी मंत्री मदन येरावार यांना कशाप्रकारे लक्ष्य करता येईल, यावर सर्वात जास्त भर विरोधकांनी दिला होता. येरावार यांच्या कार्यकाळात यवतमाळात कशी खराब कामे झाली. हे सांगण्यासाठी विरोधकांकडून एक फौजच तयार केली होती. या फौजेचे नेतृत्व आमदार बाळासाहेब मांगुळकर व माजी नगर परिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले होते.
प्रत्यक्षात मात्र, मदन येरावार यांनी यवतमाळच्या विकासासाठी सरकारकडून लाखो रुपये आणले. त्यात यवतमाळ शहरात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. खर्या अर्थाने यवतमाळच्या विकासाचे शिल्पकार माजी मंत्री मदन येरावार असताना विधानसभेत विरोधकांच्या अपप्रचारामुळे जी चूक झाली होती ती पुन्हा नको म्हणत यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदान झाले.यवतमाळ नप निवडणुकीत नगर परिषद अध्यक्ष म्हणून भाजपाच्या अ‍ॅड. प्रियदर्शनी अशोक उईके यांना 57,717 मते देऊन त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. तर एकट्याने लढलेल्या भाजपाचे सर्वात जास्त म्हणजे 28 नगरसेवक विजयी करून यवतमाळकरांनी विकासालाच आमचा कौल असल्याचे दाखवून दिले.
अध्यक्षपदासाठी भाजपाने राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या कन्या अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांना उमेदवारी दिली होती. तर दुसरीकडे काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून अभियंता प्रियंका जितेंद्र मोघे यांना उमेदवारी दिली होती.त्याही अर्थाने ही निवडणूक नेत्यांच्याही प्रतिष्ठेची झाली होती. या प्रतिष्ठेच्या लढाईत अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी 12,719 इतक्या मताधिक्याने प्रियंका मोघे यांचा दणदणीत पराभव केला. या दोन महानुभावांच्या वारसांपैकी एकीने आपला राजकारण प्रवेश जोरदारपणे केला असून, दुसरीला मात्र अपयशाचा भारी हार गळ्यात घालून घ्यावा लागला आहे, हे विशेष.