बीजिंग,
China maglev train वेगवान वाहतूक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. देशातील सुपरफास्ट सुपरकंडक्टिंग मॅग्नेटिक लेव्हिटेशन (मॅग्लेव) ट्रेनने अवघ्या दोन सेकंदांत ७०० किलोमीटर प्रतितास वेग गाठत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ही आतापर्यंतची सर्वात वेगवान सुपरकंडक्टिंग इलेक्ट्रिक मॅग्लेव ट्रेन मानली जात आहे.
हा प्रयोग चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केला. सुमारे एक टन वजनाची ही ट्रेन ४०० मीटर लांबीच्या चाचणी ट्रॅकवर धाववण्यात आली. इतक्या अल्प वेळेत प्रचंड वेग गाठल्यानंतरही ट्रेनला पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने थांबवण्यात शास्त्रज्ञांना यश आले, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे.
मॅग्लेव तंत्रज्ञानामुळे ही ट्रेन रुळांना स्पर्श न करता हवेत तरंगत धावते. सुपरकंडक्टिंग मॅग्नेटच्या मदतीने ट्रेन उचलली जाते आणि पुढे ढकलली जाते. चाक आणि रुळांमधील घर्षण पूर्णपणे टाळले जात असल्याने अतिशय वेगाने प्रवास शक्य होतो. या चाचणीचा व्हिडीओही समोर आला असून, त्यात ट्रेन चांदीसारख्या चमकदार विजेसारखी क्षणात नजरेआड होताना दिसते, मागे केवळ धूसर रेषा उरते.
शास्त्रज्ञांच्या China maglev train मते, या तंत्रज्ञानातून निर्माण होणारी वेग आणि शक्ती इतकी प्रचंड आहे की भविष्यात रॉकेट लॉन्चसाठीही त्याचा वापर होऊ शकतो. याच तंत्रज्ञानाच्या आधारे शहरांदरम्यानचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे हायपरलूपसारख्या भविष्यातील प्रवास प्रणालींनाही चालना मिळू शकते, जिथे व्हॅक्यूम ट्यूबमध्ये अतिवेगाने गाड्या धावतील.साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या प्रणालीत अल्ट्रा-हाय-स्पीड इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रोपल्शन, इलेक्ट्रिक सस्पेंशन गाइडन्स आणि सुपरकंडक्टिंग मॅग्नेट यांसारख्या अनेक जटिल तांत्रिक अडचणींवर मात करण्यात आली आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर अंतराळ, रॉकेट आणि विमानन क्षेत्रातही केला जाऊ शकतो. त्यामुळे उड्डाण अधिक सुरळीत होईल, इंधनाची बचत होईल आणि एकूण खर्चातही लक्षणीय घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.